Home विदर्भ कमिशन खोरीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला ग्रेडरकडून नकार घंटा , “किसान काँग्रेसच्या दणक्याने अखेर...

कमिशन खोरीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला ग्रेडरकडून नकार घंटा , “किसान काँग्रेसच्या दणक्याने अखेर त्या महिला शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी”

135

संजय भोयर

यवतमाळ – नेर तालुक्यातून वणी येथे विक्रीसाठी नेलेला कापूस नॉनएफएक्यू असल्याचे कारण देऊन परत पाठविण्यात आला. दोनशे किलोमीटरचा प्रवास करून कापूस खरेदी न झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला अखेर किसान काँग्रेसच्या दणक्यामुळे न्याय मिळाला.

एवढया लांब नेवुनही कापूस खरेदी न झाल्याची माहिती मिळाल्याने नैराश्यात आलेल्या शेतकऱ्याशी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी स्वतः संपर्क साधला. त्यांनी कापसाच्या गाडीसह जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यावर यवतमाळ येथेच या शेतकऱ्याच्या कापसाची मोजणी करून खरेदी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेर तालुक्यातील आडगाव (खाकी) येथील महिला शेतकरी बेबीताई प्रल्हाद साबळे यांच्या शेतातील कापूस त्यांच्या मुलाने वणी येथे विक्रीसाठी नेला होता. मात्र अर्धी गाडी रिकामी झाल्यावर उर्वरीत अर्धा कापूस हा नॉनएफएक्यू असल्याचे कारण देऊन खरेदी करण्यास नकार देण्यात आला. सदरचा माल मोजून घेण्यासाठी त्याला तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे देणे शक्य नसल्यास हा माल शेजारीच असलेल्या खाजगी व्यापाऱ्यांना चार हजार रुपये क्विंटल विकण्याचा सल्ला देण्यात आला. तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास करून गेलेल्या शेतकऱ्याला खाली हात परतावे लागल्याने प्रचंड मनस्ताप झाला. नैराश्यात जीवनाचे काहीही बरे वाईट करून घेण्याच्या मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला देवानंद पवार यांच्यामुळे फार मोठा दिलासा मिळाला.

यावर्षी लॉकडाऊनमुळे कापूस खरेदीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर किसान काँग्रेसने आवाज उठविल्यावर खरेदीची प्रक्रिया सुरु झाली. मात्र जिल्हा प्रशासनाने चुकीचे नियोजन केल्याने नेर, दिग्रस व आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कापूस वणी येथे विक्रीसाठी न्यावे लागत आहे, ही बाब शेतकऱ्यांना मनस्ताप देणारी आहे. शेकडो किलोमीटर अंतरावरून नेलेला कापूस कमिशनखोरीमुळे नॉनएफएक्यु दाखवून परत पाठविल्या जातो. संबंधित ग्रेडरला चिरीमिरी दिल्यास त्याचा कापूस खरेदी केल्या जातो असा आरोप यावेळी देवानंद पवार यांनी केला.

उल्लेखनीय म्हणजे ज्या कापसाला दर्जा नाही म्हणून परत पाठविण्यात आले होते त्या कापसाला यवतमाळ येथे ५३२५ रुपयाचा भाव मिळाला, तर वणी येथे मोजण्यात आलेल्या कापसाला फक्त ५१४० रुपयाचा भाव देण्यात आला. त्यामुळे कापूस खरेदीत किती मोठा घोटाळा होतो हे आता सिद्ध झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी होत असून कमिशन देऊ शकत नसलेल्या शेतकऱ्यांचा कापूस काहीतरी कारण दाखवून परत पाठविल्या जातो असा आरोपही पवार यांनी केला.

वणीवरून परत आलेल्या कापसाची खरेदी किसान काँग्रेसच्या दणक्यामुळे झाली असली तरी शेतकऱ्याला झालेल्या मनस्तापाची भरपाई कोण करणार व अशा कितीतरी शेतकऱ्यांवर प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण आहे असा सवालही पवार यांनी यावेळी केला. सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी श्री.गोसावी व अजय कुमार यांच्याशीही देवानंद पवार यांनी या समस्येबाबत चर्चा करून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची कल्पना दिली. यावेळी राजेंद्र हेंडवे, प्रदीप डंभारे, घनश्याम अत्रे, अरुण ठाकूर, जितेश नवाडे व चंदू नन्देशवर आदी उपस्थित होते.