Home मराठवाडा बदनापुरचा कृषी सहाय्यक काकडे 4 हजाराची लाच घेतांना अटक

बदनापुरचा कृषी सहाय्यक काकडे 4 हजाराची लाच घेतांना अटक

298

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

वडिलांच्या नावे असलेला फळबाग लागवडीचा पहिला हप्ता 63 हजाराचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडून 4 हजाराची लाच घेतांना बदनापुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कृषी सहाय्यक चंद्रशेखर बाळासाहेब काकडे (रा. एन.आर.बी.जवळ कलाग्राम समोर चिकलठाणा औरंगाबाद मुळ रा. बोरखड ता.जि.बीड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई 9 जून रोजी बदनापुर येथील न्यायालयाच्या गेटसमोर करण्यात आली.

तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे शेतात फळबाग लागवड योजना मंजुर झाली होती. याचा पहिला हप्ता 63 हजार रूपयांचा धनादेश देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे कृषी सहाय्यक काकडे यांनी 5 हजाराची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार 4 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. 9 जून रोजी बदनापुर येथील न्यायालय गेटसमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.तक्रारदार यांच्याकडून कृषी सहाय्यक काकडे यांना तडजोडीअंती 4 हजार लाच घेतांना रंगेहाथ पकडून अटक केली.

सदरचा सापळा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक रविंद्र डी. निकाळजे, कर्मचारी मनोहर खंडागळे, ज्ञानदेव जुंबड, अनिल साानप, ज्ञानेश्‍वर म्हस्के, गणेश चेके, शिवाजी जमधडे, सचिन राऊत, चालक प्रविण खंदारे, आरेफ शेख यांनी पार पाडली.