Home मराठवाडा नांदेड – परभणीकरांची चिंता पुन्हा वाढली, सेलूची महिला नांदेडला कोरोनाग्रस्त – परभणी...

नांदेड – परभणीकरांची चिंता पुन्हा वाढली, सेलूची महिला नांदेडला कोरोनाग्रस्त – परभणी जिल्हा प्रशासनाद्वारे संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

318

नांदेड, दि.२९ ( राजेश भांगे ) – नांदेडात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने अता रूग्ण संख्या झाली तीन वर,

नांदेड जिल्ह्यात मंगळवार (ता.२८) पर्यंत दोन कोरोनाबांधित रुग्ण आढळुन आले होते. दरम्यान, बुधवारी (ता. २९) परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रहिवाशी महिला नांदेडला उपचारादरम्यान कोरानाबाधित झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सायंकाळी दिली.

दोन दिवसांपूर्वीच परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला असतांना प्रशासनास कोरोनाग्रस्त ‘त्या’ महिलेसंदर्भात माहिती प्राप्त झाली. त्या आधारेच प्रशासनाद्वारे आता ‘त्या’ महिलेच्या संपर्कात सेलूतील कोणी नातेवाईक किंवा अन्य व्यक्ती आल्या का, या संदर्भात तपासणी केली जाणार आहे.
सेलू (जि.परभणी) येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. २८ एप्रिलला ती महिला सेलूत आली. तेथून उपचारानिमित्त पुन्हा नांदेडला रवाना झाली. या ठिकाणी रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीसंदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले.

संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटुंबीयांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती कळविली. दरम्यान,त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील तीनही कोरोना बांधित रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यातील दोन कोरोनाग्रस्त रुग्णाना अनेक आजार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सेलू येथे तीन दिवस कर्फ्यु….

बुधवारी (ता.२९) मध्य रात्रीपासून पुढील तीन दिवस सेलू (जि.परभणी) शहरात कर्फ्यु लागला असून अत्यावश्यक सेवे वितीरिक्त कुणालाही बाहेर पडता येणार नाही, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती

एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ३
आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन – १०२०
क्वारंटाईन कालावधी पूर्ण – २९१
अजून निरीक्षणाखाली असलेले – ६७
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – १२१
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -८९९ आज तपासणीसाठी नमुने घेतले- १००
एकुण नमुने तपासणी- ८९९
पैकी निगेटीव्ह -७९१
नमुने तपासणी अहवाल बाकी- ९९.