Home विदर्भ अमरावती शहरात संचारबंदी कठोर भाजीबाजार व फळयार्ड 27 एप्रिलपर्यंत बंद

अमरावती शहरात संचारबंदी कठोर भाजीबाजार व फळयार्ड 27 एप्रिलपर्यंत बंद

155

जीवनावश्यक वस्तू पुरवठा सुरळीत राहील

मनिष गुडधे

अमरावतीत निधन झालेल्या दोन महिलांचे कोरोना चाचणी अहवाल अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अमरावती शहरातील संचारबंदीची कार्यवाही अधिक काटेकोर करण्यात आली आहे. त्यानुसार 20 एप्रिलनंतर शहरात काही दुकाने व प्रतिष्ठानांना देण्यात आलेली सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती शहरात जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने 3 मेपर्यंत बंद राहतील. त्याचप्रमाणे, कृषी उत्पन बाजार समितीने सायन्सस्कोर मैदान, दसरा मैदान, भाजी बाजार येथील भाजीपाला व फळयार्ड 27 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला. हा आदेश अमरावती महापालिकेच्या क्षेत्रासाठी लागू आहे. कोरोनाचा प्रभाव नसलेल्या क्षेत्रात यंत्र, मोटरपंप, अवजड यंत्र, दुरुस्ती दुकाने, फरसाण, कन्फेशनरी आदी सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार काही दुकानांना परवानगीही देण्यात आली. मात्र, दोन पॉझिटिव्ह रूग्ण (मयत) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिलपूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोणत्याही भाजीपाला, फळविक्रेते यांनी महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय व्यवसाय करु नये. त्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नियोजन करण्यात यावे, असे नियोजन करताना अमरावती शहराकरीता प्रभागनिहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरुन नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही. क्लस्टर आणि कंटेनमेंटर झोनमध्ये महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करावे. पोलीस आयुक्तांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 ची काटेकोरपणे अंमलबजावणीची कार्यवाही करावी. क्लस्टर व कंटेनमेंट झोनमध्ये गर्दी होऊ नये यासाठी रहदारीबाबत नियोजन करुन त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

किराणा, दूध, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू व त्यासंबंधित किरकोळ, घाऊक, अत्यावश्यक सेवा विक्रेता यांची सेवा ही सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहील. औषधी केंद्रे व रूग्णालये नियमित सुरू राहतील. या काळात जिल्ह्याच्या सीमा बंद असतील व जिल्ह्याच्या सीमेवरुन प्रवेश करणाऱ्या वाहनांना नाकाबंदी करुन प्रतिबंध करण्यात येईल.