Home महत्वाची बातमी दुसऱ्याचे आधार कार्ड वापरून अनोळखी व्यक्तीने केला दिल्ली प्रवास

दुसऱ्याचे आधार कार्ड वापरून अनोळखी व्यक्तीने केला दिल्ली प्रवास

55
0

कोरपना – मनोज गोरे

एका अनोळखी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर करून रेल्वेने दिल्ली प्रवास केल्याची गंभीर घटना नुकतीच समोर आली आहे.
सध्या शासनाकडून बाहेर राज्यातून किंवा मोठ्या शहरांमधून खेड्यापाड्यात आलेल्या किंवा रेल्वे व विमानाने प्रवास केलेल्या नागरिकांची माहिती घेणे सुरू आहे. अशातच एक गंभीर बाब समोर आलेली आहे. कोरपना तालुक्यातील बिबी येथील रमेश शिवराम भोयर (४२) यांच्या नावे दिल्ली ते बल्लारपूर प्रवास झालेले दाखविण्यात आले आहे. मात्र सदर व्यक्ती दिल्लीला कधी गेलेच नाही. विशेष म्हणजे गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते गावाबाहेर पण गेले नाही. मात्र त्यांच्या आधार कार्डचा नंबर वापरून कोणीतरी प्रवास केला असून पोलीस व डॉक्टरांची चमू त्यांना क्वारंटाईन करण्याकरिता त्यांच्या घरी पोहचली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर चमू त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर ही गंभीर बाब उघडकीस आली. अशाप्रकारे अनेक लोकांनी खोटे व बनावट आधार कार्ड वापरून देशभर प्रवास केला असावा असे या प्रकरणावरून निष्पन्न होते.
काल (दिनांक १ ला) रमेश भोयर यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र ही गंभीर बाब समोर आल्यामुळे व त्यांच्यामध्ये तसले प्रकारचे लक्षण दिसत नसल्यामुळे व त्यांच्या विनंतीमुळे त्यांना आज रुग्णालयातून ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या घरी सोडण्यात आले.

रमेश भोयर ही व्यक्ती आमच्या बिबी गावातील असून गेल्या अनेक महिन्यांपासून ते गावाबाहेर पडलेले नाही. मात्र त्यांच्या आधार कार्डचा वापर करून अशा पद्धतीने एका अनोळखी इसमाने प्रवास केल्यामुळे रमेश भोयर यांच्यावर क्वारंटाईनमध्ये राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतीत होते. ही घटना गंभीर असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्याकरीता पोलिसांनी कसून तपासणी करून कारवाई करण्यात यावी.

आशिष देरकर, उपसरपंच, जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी