Home जळगाव कोरोना रुग्णांची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा जिल्हाधिकारी डॉ...

कोरोना रुग्णांची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

334
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचे नाव व तपासणी अहवाल सोशल मिडीयावर प्रसारित करणा-या अज्ञाताविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधितांचा शोध जिल्हा सायबर सेलने लवकरात लवकर घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिलेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात काल एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला असून या रुग्णाचे नाव व तपासणी अहवाल सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून ही अतिशय गंभीर बाब आहे. असे करणा-याविरुध्द तातडीने गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तसेच यापुढे याप्रकारची माहिती तसेच अफवा पसरविणारे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी झाली आहे का याबाबतची खात्री करावी. तसेच मुंबई व पुण्याहून आलेल्या नागरीकांमध्ये कोरोना सदृश काही लक्षणे आढळून येत असल्यास त्यांचीही तातडीने तपासणी करावी. तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुगणालयात 5 ॲम्बुलन्स ठेवण्यात याव्यात. तसेच संशयितांचे नमुने तपासणीस पाठविण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयाला अजून दोन वाहने उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन तपासणी नमुने तातडीने पोहोच करता येतील.
शाहू महाराज रुग्णालयात दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत. रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश बंद करण्यात यावात. रुग्णांना चहा, नाश्ता व जेवण देण्याची व्यवस्था करावी. पोलीसांनी भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या हातगाडया जमा करु नये. गर्दी टाळण्यासाठी आवश्यकता भासली तर सिंधी कॉलनीतील मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर दुधाचे भाव कमी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे. तेव्हा शासन दरापेक्षा दुधाचे भाव कमी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी.
कोरोना पॉझिटीव्ह सापडलेल्या रुग्णांचे नातेवाईकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. तो राहत असलेल्या परिसरात महानगरपालिकेचे कर्मचारी समुपदेशन करीत आहे. तसेच या परिसरात गर्दी होवू नये याकरीता पोलीस लक्ष ठेवून आहेत. सदरचा रुग्णांने ज्या रेल्वे प्रवास केला त्याचा सविस्तर तपशील रेल्वे प्रशासनास देण्यात येवून त्याच्या सोबत प्रवास केलेल्या प्रवाशांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन संबंधित नागरीकांना रेल्वे प्रशासनाने करावे अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.
*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे जिल्हावासियांना आवाहन*
प्रिय, जळगाव जिल्हावासियांनो, कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर थैमान घालत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. प्रधानमंत्री यांनी देशभर लॉकडाऊन केला आहे. राज्यात या विषाणूचा संसर्ग वाढू नये. याकरिता मा. मुख्यमंत्री विविध महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. तर जिल्हा प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी या निर्णयांची अंमलबजावणी करीत आहे. याचा परिणाम म्हणून अद्यापपर्यंत आपल्या जिल्ह्यात एकही रूग्ण आढळून आलेला नव्हता. परंतु काल एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आता आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे हेच आपल्या हिताचे आहे.
मी पालकमंत्री या नात्याने सर्व जिल्हावासियांना नम्र आवाहन करतो की, आपणास जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता पडणार नाही. तेव्हा घाबरू नका ….. पण जागरूक रहा. लॉकडाऊन संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अनावश्यक प्रवास टाळा. प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी आहे. आपण सहकार्य करा. आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.
*जिल्हावासियांना जिल्हाधिकारी यांचे आवाहन*
जळगाव जिल्हावासियांनो, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये पण जागरूक रहाणे आवयक आहे. संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नका. गर्दीत जावू नका. जीवनावश्यक वस्तूंसाठी होम डिलीव्हरी मागवा. संयम बाळगा. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोणीही लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. अन्यथा प्रशासनास कठोर पावले उचलावी लागतील याची सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी नागरीकांना केले आहे.

Previous articleसंचार बंदी असताना कारंजा ला भरला बाजार बाजारात ग्राहकांची गर्दी….!!
Next articleबोर्डी ग्रामस्थांचा लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद…. ग्राम पंचायत बोर्डी कडून कोरोना विषयी जनजागृती….
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here