सय्यद नजाकत
जालना-कोरोना आजारा संदर्भात जनतेने कोणतीही भिती न बाळगता केवळ स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांनी केले आहे. जालना पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात जंतूनाशक फवारणी सुरु करण्यात आली असून, नागरीकांनी यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना नगर परिषद प्रशासनाने झपाट्याने पावलं उचलली आहेत. जालना शहर व जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नसला तरी या आजाराची लागण झाल्यास तो झपाट्याने फोफावतो ही बाब लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनातर्फे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून स्वत: मोहीमेबरोबरच प्रत्येक प्रभागात आणि प्रभागातील प्रत्येक भागात नगर परिषदेतर्फे छोट्या ट्रॅक्टरव्दारे जंतूनाशक फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या फवारणीच्या संदर्भात त्या- त्या प्रभागातील नगरसेवकांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेऊन प्रत्येक ठिकाणी फवारणी करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट करत नागरीकांनी देखील कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा नगराध्यक्षा सौ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे.