Home विदर्भ अमरावतीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी , शहरात फिरणार्‍या अनेकांना चोप….

अमरावतीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी , शहरात फिरणार्‍या अनेकांना चोप….

152

उठबशा काढण्याची मिळाली शिक्षा
पोलिसांचे विविध ठिकाणी चेक पॉईंट

मनिष गुडधे

अमरावती – संचारबंदीचे सुधारीत आदेश सोमवारी रात्री जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले होते. त्या आदेशानुसार मंगळवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. अमरावती शहरात विशेष कारण नसताना फिरणार्‍या अनेकांना पोलिसांचा चांगलाच चोप बसला. शहरात विविध ठिकाणी चेक पॉईंट लावण्यात आले असून तपासणी करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहानावरून रविवार जनता कर्फ्यू यशस्वीपणे पाळण्यात आला. मात्र, सोमवारी काही नागरिकांनी प्रतिबधात्मक आदेश झुगारून शहरात मुक्त संचार केला होता. हीच स्थिती राज्यातल्या अन्य भागातही होती. त्यामुळे संचारबंदीचे आदेश काढण्यात आले होते. जिल्हाधिकारी नवाल यांनी सांयकाळी संचारबंदीचे आदेश काढले. त्या आदेशानुसार सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याचे नमुद होते. त्यानुसार विक्रीची दुकाने ठिकठिकाणी सुरू होती. या काळात चित्रा चौक, पठाण चौक व अन्य काही भागात ग्राहकांनी गर्दी केली होती. तर सवलीतीचा फायदा घेऊन शहरात फिरणार्‍यांची संख्याही मोठी होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर साहित्य खरेदीचे कारण काही मंडळी देत होते. काही नागरिक रुग्णालयात व औषधी दुकानात जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांच्या कागदपत्रांची खातरजमा केल्यावर पोलिसांनी त्यांना जाऊ दिले. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणार्‍यांना कोणतीच आडकाठी आली नाही. दुपारी 3 वाजतानंतर पोलिसांनी संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली. सर्व प्रमुख चौकांमध्ये असलेल्या पोलिसांनी प्रत्येकांची चौकशी केली. कोणते काम आहे, कुठे चालले, कुठे गेले होते, आता कुठे चालले असे प्रश्न विचारले. ज्यांनी पुराव्यानिशी संवाद साधला त्यांना पोलिसांनी सुचना देऊन जाऊ दिले. जे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, त्यांना मात्र पोलिसांनी चांगलाच चोप दिला. विनाकारण फिरणार्‍या बहुतांश मंडळींना चोप बसला. त्यात तरूणांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. काही महाभाग तर दवाखान्याच्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन बाहेर पडले होते. त्यांना तर चोपही बसला आणि उठबशा काढण्याची शिक्षा पोलिसांकडून मिळाली. एकंदरीतच अमरावतीत मंगळवारी खर्‍या अर्थाने कर्फ्यू जाणवला. मंगळवारचा संपूर्ण दिवसभराचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी नवाल यांनी जीवनावश्यक वस्तुच्या खरेदी व विक्रीच्या वेळेत बदल केला आहे. हा बदल बुधवार सकाळपासून अंमलात येणार आहे. या बदलानुसार सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच जीवनावश्यक वस्तु मिळणार आहे.