Home महत्वाची बातमी “कोरोना” आपण सर्व काळजी घेऊ या –  देवेंद्र भुजबळ

“कोरोना” आपण सर्व काळजी घेऊ या –  देवेंद्र भुजबळ

41
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

जगभरच मानव स्वतःला खूप मोठा समजत आला आहे,असं दिसतं. पण निसर्ग मानवाला असा काही अचानक तडाखा देतों की एका क्षणात होत्याचे नव्हते करून टाकतो. उदाहरणे म्हणजे, महापूर, भूकंप, सुनामी आणि साथीचे रोग. एकीकडे माणूस अंतराळात जातो,रहातो परतही येतो.पण निसर्गाचं अंतरंग अजून माणसाला उलगडलेले नाही,हे आपणास मान्यच करावे लागेल. निसर्ग हा निसर्गच. तो काही देश, धर्म, भाषा, प्रांत,श्रीमंती, गरिबी अशा मानव निर्मित बाबी पहात नाही. जसा तो प्रेमळ असतो,तसाच तो वेळ प्रसंगी अत्यन्त निष्ठुर होतो. आता हेच पहा ना, २०-२० ही परिभाषा क्रिकेट मुळे भारतात परिचित आहे. त्यात हे वर्ष २०२०! किती उस्थाहात सुरू झाले, किती नवनवीन योजना, उपक्रम आपण हाती घ्यायचे ठरवले आणि बोलता बोलता क्षणोक्षणी सर्वच काही बदलत आहे, ते कोरोना मुळे! कोरोना कोरोनाचा अर्थ मी शब्दकोशात शोधला तर सापडला नाही. पण कोरोनेशन या शब्दाचा अर्थ म्हणजे राजा किंवा राणीचा राज्याभिषेक असा शब्दकोशात आहे. कदाचित त्या वरून कोरोना शब्द निर्माण झाला असावा,असे वाटते. नुकताच काही देशांच्या संवाद दौऱ्यावर मी जाऊन आलो .त्यात आर्मेनिया देशातील येरावन या राजधानीच्या शहरात ज्या हॉटेलमध्ये मी रहात होतो, त्याचे नावच कोरोना होते. तर दुसऱ्या एका देशातील लोकप्रिय बिअरचे नाव देखील कोरोना होते. कोरोनाचा विषाणू राजमुकुट दिसतो तसा दिसत असावा म्हणून शास्त्रज्ञांनी कोरोनावायरस डिसीज ( कोविद -१९)असे नाव दिले असावे. जागतिक स्थिती चीनच्या वुहान येथून सुरू झालेल्या या आजाराने बघता बघता जागतिक साथीचे रूप धारण केले आहे. कोरोनाचे संकट ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने ११मार्च २०२० रोजी कोरोनाला “जागतिक साथ” म्हणून जाहीर केले आहे . या क्षणी म्हणजेच २० मार्च २०२० सकाळी ९.४४ वाजेपर्यंत जगात कोरोनामुळे २ लाख ४६ हजार ७९९ व्यक्ती बाधित आहेत. आतापर्यंत १०हजार ०६४ बाधित मरण पावले आहेत. भारतीय स्थिती भारतात आतापर्यंत कोरोनाचे २०६ बाधित आढळून आले आहेत. तर ५ जण मरण पावले आहेत. कोरोंनाची लक्षणें कोरोनाची प्राथमिक लक्षणें म्हणजे सर्दी,खोकला,ताप ही असून गंभीर लक्षणे म्हणजे श्वासोच्छ्वासाला त्रास होणे,अधिक त्रास होणे, पुढे नुमोनिया होणे, किडनी निकामी होणे आणि शेवटी मृत्यू ही होत. कोरोनाचा विषाणू जनावरातून मानवात आला असावा,असा कयास आहे.

प्रतिबंधात्मक उपाय कोरोनापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने सतत काळजी घेणे आवश्यक आहे. यात कुठेही स्पर्श झाला की स्वच्छ हात धुणे,खोकल्याची उबळ येत असल्यास आपले नाक, तोंड झाकून घेणे,कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीपासून दूर रहाणे, अन्न, विशेषतः मांसाहार,अंडी व्यवस्थित शिजवून घेणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे इत्यादि होत.याशिवाय आम्ही आमच्या कॉमा संवाद उपक्रमात जे आवर्जुन सांगत असतो,ते म्हणजे आपला दैनंदिन दिनक्रम हा आरोग्यदायक असला पाहिजे. पुरेशी झोप,आराम, सकस आहार, व्यायाम, ध्यान धारणा,प्रार्थना यामुळे आपली शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम राहण्यास मदत होते. यामुळे केवळ दैनंदिन कार्यक्षमताच वाढते असे नाही, तर रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. तसेच आजही आपण काही आजार झाल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही. तर असे न करता, किमान प्रत्येक स्त्री- पुरुषाने आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने चाळिशीनन्तर दरवर्षी काही आवश्यक आरोग्य तपासण्या नियमितपणे करून घेत जाव्यात.

सरकारचे उपाय भारत सरकारने कोरोनाचे गांभीर्य वेळीच ओळखले आणि तातडीने उपाययोजना सुरू केल्या. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा सतत आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी उच्च स्तरीय मंत्रीगटाची स्थापना केली आहे. साथ प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतुदी देशात लागू करण्यात आल्या आहेत. सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ नुसार कोरोनाला आपत्ती म्हणून घोषित केले आहे. देशातील सर्वच विमानतळावर प्रवाशांच्या कसून तपासण्या होत आहेत.परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणले आहे, आणले जात आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १९ मार्च २०२० रोजी राष्ट्राला उद्देशून केलेले आवाहन आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य कथन करून गरिबांना मदत करण्याचे, आपल्यासाठी दिवसरात्र राबणाऱ्या यंत्रणांचे रविवारी, दिनांक २२मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता सामूहिक आभार मानण्याचे केलेले आवाहन, स्वयंस्फूर्तीने संचारबंदी या सर्व बाबींचे आपण कसोशीने पालन केले पाहिजे. महाराष्ट्रातील स्थिती देशातील विविध राज्य सरकारे अहोरात्र काम करीत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने देखील त्वरित उपाययोजना हाती घेतल्या आहेत.वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य,आवश्यक ते निर्णय घेतले आहेत,घेण्यात येत आहेत.तात्काळ उपाययोजना सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्याची मुंबई ही राजधानी असली तरी ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्राबरोबर शेजारच्या राज्यातील अनेक प्रवासी मुंबई विमानतळावरूनच देशात,परदेशात ये जा करीत असतात. महाराष्ट्र प्रगत राज्य असल्याने राज्यात रोजीरोटी साठी येणाऱयांची संख्या अगणित आहे. त्यामुळे महाराष्ट्र मोठ्याच आव्हानाला तोंड देत आहे. महाराष्ट्रात २०मार्च २०२० रोजी दुपारपर्यंत ५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एक जण मरण पावला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे दिवसरात्र प्रभावीपणे परिस्थिती हाताळत आहेत.आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत ठेवून ते आपणास दिलासा देत आहेत. सर्व संबंधित मंत्री महोदयही सतत सक्रिय आहेत. या कसोटीच्या वेळी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, कर्मचारी,सर्व यंत्रणा भूक- तहान,वेळ काळ न पाहता अथक प्रयत्न करत आहेत. यापूर्वी, नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्तीत पोलीस, महसूल, आरोग्य,वाहतूक असे सर्व विविध सरकारी विभाग अहोरात्र काम करत आले आहेत. आपली जबाबदारी सरकारने हाती घेतलेल्या तपासणी, उपचार, गर्दी कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय ,केलेली आवाहने यांची काटेकोर अंमलबजावणी करणे, स्वतःबरोबरच इतरांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आपण ती पाळत आहोतच. पाळत राहू या . विश्वास मानवाने आजपर्यंत अनेक नैसर्गिक आपत्ती, साथी, युद्धे यांना यशस्वीपणे तोंड दिले आहे.मानवाने प्लेग,कुष्ठरोग,कॉलरा, देवी,क्षयरोग, पोलियो अशा अनेक आजारांचे ,रोगांचे निर्मूलन केले आहे. जगातील शास्त्रज्ञ आता कोरोनाविषयीही अहोरात्र संशोधन करीत आहेतच. पण कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण होण्यासाठी, निश्चित उपचार पद्धती विकसित होण्यासाठी काही वेळ लागेलच.तो पर्यंत कोरोनाची लागण आपणास होणार नाही, तो पसरणार नाही,याची आपण सतत दक्षता घेत राहू या. आपण यापूर्वी इतर आपत्तीशी खंबीरपणे लढा देऊन यशस्वी झालो आहोत. कोरोना आपत्तीशीही आपण प्रभावी पणे लढून यशस्वी होऊ या.

जयहिंद- जयमहाराष्ट्र.

देवेंद्र भुजबळ

91 9869484800. Email: devendrabhujbal4760@gmail.com

संदर्भ:स्वानुभव, जागतिक आरोग्य संघटना वेब साईट,गुगल स्तोत्र, प्रसार माध्यमे, इत्यादी.

Unlimited Reseller Hosting