Home मराठवाडा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध...

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना

143
0

जनता कर्फ्यू 22 मार्च रोजी

मद्य,बिअर विक्री 31 मार्चपर्यंत बंद

जप्त फेस मास्क, हॅण्ड वॉश लिक्वीड, सॅनिटायजर आरोग्य विभागास

अब्दुल कय्युम

औरंगाबाद-कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे. त्याअनुषंगाने या ‍दिवशी जिल्ह्यातील जनतेने सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या आजाराबाबत औरंगाबाद जिल्ह्यात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने दुकान, मॉल्स, हॉटेल्स, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने व पान टपऱ्या बंद ठेवण्याचे, नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

मद्य,बिअर विक्री बंद

संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व देशी मद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, विदेशी मद्य व बिअरची किरकोळी विक्री अनुज्ञप्ती, बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती व एफएल-1/सीएल-2 या अनुज्ञप्ती 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचेही जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी ‍ आदेशित केले आहे.

जप्त साहित्य आरोग्य विभागास

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वापरण्यात येणारे फेस मास्क, हॅण्ड वॉश लिक्विड, सॅनिटायजर आदींचा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साठ्यापैकी उत्तम प्रतीचे व उपयुक्त फेस मास्क, हॅण्ड वॉश लिक्वीड, सॅनिटायजर्स आरोग्य विभागास सुपूर्द करण्यात येणार आहे.

सीएसआर निधीतून मास्क, हँडवॉशबाबत सूचना

सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जसे फेस मास्क, हँन्ड वॉश लिक्वीड, सॅनिटायजर्स इ. साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.