
लिंग बदल केलेले ललित साळवे विवाहबद्ध…!!
अमीन शाह
बीड , दि. १७ :- शरीरातील हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची परवानगी मागणारी महिला पोलिस कर्मचारी ललिता साळवे हिची लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर नवी इनिंग सुरू झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेचा पुरुष झालेल्या ललित साळवे याने औरंगाबाद जिल्ह्यातील सीमाशी (नाव बदलले आहे) संसार थाटला आहे.
ललित साळवे सध्या माजलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असून त्याने रविवारी बौध्द विवाह पद्धतीने विवाहबद्ध झाला. माजलगाव येथे ललित आणि सीमाचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सीमा ही बीएच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून ती शिक्षण घेत आहे. खूप मोठ्या संघर्षानंतर ललितचे सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या सोहळ्याला नातेवाईक मंडळींनी हजेरी लावत नवदांपत्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
बीड पोलिस दलातील कर्मचारी ललिता साळवे हिने शरीरातील हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची परवानगी मागितली होती. पोलिस दलातील क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली होती. महाराष्ट्र पोलिस दलातील ही पाहिलीच घटना होती. लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी मागितल्याने ललिता साळवे हिची राज्यभर चर्चा झाली होती. ललिता साळवे हिनं मोठी प्रशासकीय लढाई लढून ललित म्हणून यश मिळवले आणि विवाहबद्ध होत संसाराचे जोडीदारासोबत पाहिले पाऊल यशस्वीरित्या टाकले आहे.
ललित साळवे हा गुण्यागोविंदाने संसार करणार आहे. या अगोदर पहिल्यांदा ललिताचा ललित असा कागदोपत्री देखील बदल करण्यात आला असून ललित संपूर्णपणे तंदरूस्त असल्याचा अहवाल वैद्यकीय खात्याने दिला होता. तब्बल एक वर्षानंतर रविवारी ललित साळवे याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.











































