Home यवतमाळ नागरिकांनो, उत्सव साजरा करा पण कायद्याचे भान ठेवा –  पोलीस निरीक्षक रामकृष्ण...

नागरिकांनो, उत्सव साजरा करा पण कायद्याचे भान ठेवा –  पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांचे आवाहन

226

सुरक्षेसाठी यवतमाळ शहर पोलीस सज्ज

३६ सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश; ड्रोन आणि सर्व्हिलन्स व्हॅनची राहणार करडी नजर

यवतमाळ (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. “नागरिकांनी कोणत्याही चिंतेशिवाय उत्सव साजरा करावा, मात्र कायद्याचे भान राखावे,” असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी केले आहे.

जयंती उत्सवासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून, सध्या शहरात १२ अधिकारी आणि १०४ पोलीस अंमलदारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आणि जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून, ती देखील ठिकठिकाणी तैनात केली जाणार आहे. शहरातील प्रत्येक मिरवणूक मार्ग, महापुरुषांचे पुतळे आणि बुद्धविहार परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

गुन्हेगारांवर मोठी कारवाई
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला आहे. यवतमाळ शहर हद्दीतील एकूण ३६ रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना उद्यासाठी शहरातून बाहेर घालवून लावण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून (SDO) प्राप्त झाले आहेत. यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हायटेक यंत्रणा सज्ज
केवळ मनुष्यबळच नव्हे, तर तांत्रिक मदतीनेही पोलीस लक्ष ठेवणार आहेत. यासाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका, दंडाधिकारी यांच्यासह झूमर व्हॅन (लाईट व्हॅन) आणि सर्व्हिलन्स व्हॅन (देखरेख गाडी) तैनात करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातूनही देखरेख केली जाणार आहे.

“प्रशासनाने जयंती उत्सवाची पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांनी उत्साहात आणि शांततेत जयंती साजरी करावी. काहीही अडचण किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहोत.”
— रामकृष्ण जाधव, पोलीस निरीक्षक, यवतमाळ शहर