Home यवतमाळ नागपूर – तुळजापूर हायवेवर आयपीएल सट्ट्यावर धाड; तिघांसह ५.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर – तुळजापूर हायवेवर आयपीएल सट्ट्यावर धाड; तिघांसह ५.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

215
यवतमाळ ( प्रतिनिधी ) – नागपूर–तुळजापूर हायवेवर मोबाईलद्वारे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी धाड टाकत तिघा आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ०९ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, तुळजापूर–नागपूर हायवेवरील नरसापूर येथील प्रवासी निवाऱ्यासमोर उभी असलेल्या चारचाकी वाहनात काही इसम मोबाईलवर आयपीएल सामन्यावर पैशांची बाजी लावत आहेत. मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून तात्काळ कारवाईचे आदेश घेण्यात आले.
त्यानुसार पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता, नमूद ठिकाणी हुंडाई EXTER (क्रमांक MH 29 CJ 0288) या वाहनात तीन इसम बसून मोबाईलद्वारे आयपीएल सट्टा खेळताना आढळून आले. त्या वेळी Lucknow Super Giants विरुद्ध Kolkata Knight Riders हा सामना सुरू होता.
पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:
देवेंद्र दिलीपकुमार कटीयारा (वय २८, रा. परळवाडी कॅम्प, यवतमाळ, आशुतोष लक्ष्मीकांत गुप्ता (वय २९, रा. मारवाडी चौक, यवतमाळ ), दिलेश संतोष कुकुलवार (वय २८, रा. चापनवाडी, जि. यवतमाळ) आरोपींकडील मोबाईलची पंचासमक्ष तपासणी केली असता ते संबंधित सामन्यावर पैशांची बाजी लावून हार-जीत स्वरूपाचा जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सट्टा खेळण्यासाठी वापरण्यात आलेले ४ मोबाईल फोन (अंदाजे किंमत १,६०,००० रुपये), रोख रक्कम ४,८७० रुपये तसेच सट्ट्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ४,००,००० रुपये) असा एकूण ५,६४,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्यांना कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनीष गावंडे, पोउपनि गजानन राजगोलू, सईद साजीद, योगेश गटलेवार, अजय डोळे, प्रशांत हेडाड, रूपेश पाली, योगेश डगवार, सुनिल पैठणे, देवेंद्र होले, आकाश सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.