
अमिन शाह
समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने महामार्गाची सफाई करणाऱ्या महिला कामगारांच्या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्या जवळील जामनेर-कडवंची शिवारात हा अपघात झाला असून, संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
भरधाव ट्रकने घेतला कामगारांचा बळी ,
मिळालेल्या माहितीनुसार, या महिला कामगार समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत. काम आटोपून कामगार महिला त्यांच्या गाडीत बसल्या. त्यांची गाडी महामार्गाच्या कडेला उभी असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने तिला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये सात महिला कामगारांना जागीच आपले प्राण गमवावे लागले, तर अन्य जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिनाभरात दुसरी मोठी दुर्घटना; प्रशासन सुस्त ?
विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ अशाच एका भीषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा रस्ता दुरुस्तीचे काम करून जेवण करत बसलेल्या कामगारांना एका ट्रकने चिरडले होते. एकाच महिन्याच्या अंतराने कामगारांचा बळा घेणारा हा दुसरा मोठा अपघात असल्याने, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृतांमध्ये महिला कामगारांचा समावेश ,
मृतांमध्ये महिला कामगारांचा समावेश आहे. कडूबाई रामदास मदन (४५), ताराबाई गहीनाजी चौधरी (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (३५, केळीगव्हाण), अलका दादाराव आदमाने (४५), मीना परमेश्वर आदमाने (४४), कांचन प्रकाश आदमाने (५०, निधोना) अशी मयतांची नावे आहेत. अपघातामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील ‘ओव्हरस्पीड’ आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.















































