Home यवतमाळ “गंदा है, पण धंदा है”

“गंदा है, पण धंदा है”

250
यवतमाळमध्ये सट्टा बाजाराचे जाळे दुबईपर्यंत; IPL सोबत काळ्या पैशांचा खेळ रंगात
यवतमाळ  –  Indian Premier League (IPL) सुरू होताच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह उसळला, पण त्याचवेळी शहरात सट्टा बाजारानेही जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपताच मैदानात सामने रंगले आणि पडद्यामागे कोट्यवधींचा काळा खेळही सुरू झाला आहे.
यंदा सट्टा बाजार अधिक संघटित, तांत्रिक आणि सावध पद्धतीने चालवला जात असल्याचे चित्र आहे. शहरातील काही तथाकथित “प्रतिष्ठित” आणि स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यकर्ते म्हणवणारे चेहरे आता या धंद्यात सक्रिय झाल्याची चर्चा जोरात आहे. दिवसा समाजसेवेची भाषा आणि रात्री सट्ट्याच्या व्यवहारात गुंतलेली ही दुहेरी भूमिका उघडपणे दिसू लागली आहे.
यवतमाळातील एका नामांकित हॉटेल्स बसून व्यवहार केले जात आहेत, तर काही जण थेट घरातून मोबाईल आणि WhatsApp सारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून सट्ट्याचे रेट, बेटिंग आणि पेमेंट्स हाताळत आहेत. विशेष म्हणजे, शहरात फिरणारी एक पांढऱ्या रंगाची अ‍ॅक्टिवा गाडी या संपूर्ण नेटवर्कचा ‘मोबाईल हब’ बनल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पैशांची देवाणघेवाण, कलेक्शन आणि सेटलमेंटसाठी ही गाडी दिवसभर शहरभर फिरताना दिसत असल्याचे सांगितले जाते.
या रॅकेटचे धागेदोरे केवळ यवतमाळपुरते मर्यादित नसून थेट दुबई पर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हवाला मार्गे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे संकेत आहेत. विशेषतः बालाजी चौक आणि सरदार चौक परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याची चर्चा आहे.
या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने मात्र संशयास्पद शांतता बाळगल्याचे दिसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल, खुलेआम सुरू असलेले नेटवर्क आणि शहरभर फिरणाऱ्या संशयित हालचाली असूनही ठोस कारवाईचा अभाव प्रश्नचिन्ह निर्माण करतो. दुसरीकडे काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची या प्रकरणातील कथित भूमिका अधिकच गंभीर बनते.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे २५ ते ३० वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणावर या सट्टा बाजाराकडे आकर्षित होत आहेत. एका दिवसात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत अनेक जण या जाळ्यात अडकत असून आपले करिअर आणि भविष्य धोक्यात घालत आहेत. चित्रपटांतील झगमगाट आणि जलद श्रीमंतीची भ्रामक कल्पना त्यांना वास्तवापासून दूर नेत आहे.
उद्याच्या अंकात :
यवतमाळमधील कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सट्टा बाजाराशी थेट संबंध? नावां….!