Home महत्वाची बातमी दारव्हा पंचायत समिती लेखा विभागात “२ टक्के” व्यवहाराचे आरोप, “चौकशीची मागणी”

दारव्हा पंचायत समिती लेखा विभागात “२ टक्के” व्यवहाराचे आरोप, “चौकशीची मागणी”

363
दारव्हा ( प्रतिनिधी ) – दारव्हा पंचायत समितीच्या लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यावर अलीकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) कडून कारवाई झाल्यानंतरही संबंधित यंत्रणांमध्ये सुधारणा झाल्याचे चित्र दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आता दारव्हा पंचायत समितीच्या लेखा विभागातही बिले मंजुरीसाठी कथित ‘२ टक्के’ रकमेची मागणी केली जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
स्थानिक ठेकेदार तसेच काही नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च एंडिंगच्या कालावधीत निधी खर्चाची घाई आणि प्रलंबित बिले मंजूर करण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अनधिकृत व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. या प्रक्रियेत बिले लवकर मंजूर करून देण्यासाठी ठरावीक टक्केवारीची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या आरोपांबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. एसीबीकडून यापूर्वी कारवाई झाल्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र वृत्त लिहीपर्यंत ती उपलब्ध होऊ शकली नाही.