Home यवतमाळ चिखलवर्धा येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न…

चिखलवर्धा येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न…

61

घाटंजी ( तालुका प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिखलवर्धा येथील जामा मस्जिद परिसरात जमाअत-ए-इस्लामी हिंद, चिखलवर्धा यांच्या वतीने दि. ३१ मार्च २०२६ रोजी आयोजित “ईद मिलन व मस्जिद परिचय” हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, सौहार्दपूर्ण व ऐक्याच्या मंगलमय वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर समज, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याच्या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील प्रख्यात इस्लामिक विचारवंत प्रा. वाजीद अली खान यांची मानाची उपस्थिती लाभली. त्यांनी “मस्जिद परिचय” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि विचारप्रवर्तक शैलीत मार्गदर्शन करत मस्जिदीचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे उलगडून सांगितले.

प्रमुख वक्ते म्हणून पुसद येथील सय्यद सलमान सर यांनी भारतीय संतपरंपरेच्या संदर्भातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि मानवतेच्या सार्वत्रिक मूल्यांवर अत्यंत प्रभावी व अंतर्मुख करणारे विचार मांडले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे तसेच पारवा येथील ठाणेदार हेमंत चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात सामाजिक ऐक्य, परस्पर आदर व सौहार्द जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांची आजच्या काळातील आवश्यकता ठळकपणे मांडली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचा पवित्र कुरआन (मराठी भाषांतर) भेट देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा जमाअत-ए-इस्लामी हिंद, चिखलवर्धा चे अध्यक्ष अब्दुल वाजिद तसेच नसरुद्दीन पठाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमास ग्रामपंचायतीतील मान्यवर पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गावाचे पोलीस पाटील गणेश कुमरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कांबळे, महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे कर्मचारी तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.

यामध्ये पारवा येथील अमोल उदार, कत्तुरवार; ताटसावळी येथील मोनेश्वर पाटिल, अरविंद भगत, समाधान कनिंदे, गणेश तोक्कुलवार, इस्तारी आपतवार; गोविंदपूर येथील सुधाकर चव्हाण, रमेश राठौड़, श्रावण जाधव, कैलाश जाधव, ज्योति चव्हाण, गौरथडा येथील जैतूजी मेश्राम, गजू गेडाम; तसेच चिखलवर्धा येथील सुनील कुमरे आकाश नडपेलवार, विजय कनाके, दिनेश नडपेलवार, महेश पेंदोर, सचिन केळझरकर, रतन वाघमारे, संभू पेंदोर इत्यादी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली.

चिखलवर्धा, कुर्ली, गोविंदपूर, ताटसावली व पारवा येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

“ईद मिलन” व “मस्जिद परिचय” या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये संवाद, परस्पर समज व विश्वास वृद्धिंगत करण्याचा एक स्तुत्य व प्रेरणादायी प्रयत्न यशस्वीपणे साकार झाला. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुज़म्मिल पठाण यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर उपस्थितांना पारंपरिक शिरखुर्म्याचा आस्वाद देण्यात आला आणि आनंद, समाधान व सौहार्दाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.