Home यवतमाळ हे राम… पुन्हा आयपीएल सट्ट्याचा झोल….!

हे राम… पुन्हा आयपीएल सट्ट्याचा झोल….!

193

यवतमाळ  ( प्रतिनिधी ) – यवतमाळ शहरात पुन्हा एकदा आयपीएल सट्टा बाजाराने डोके वर काढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील काही वर्षांप्रमाणेच यंदाही सट्टेबाजांनी आपली पूर्ण तयारी करून मैदानात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी हा संपूर्ण प्रकार अधिक संघटित आणि ‘हायटेक’ पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

शहरातील एका नामांकित हॉटेलमधून या सट्टा रॅकेटचा कारभार सुरू झाल्याची चर्चा जोरात आहे. या ठिकाणी अत्याधुनिक लॅपटॉप, हाय-स्पीड वायफाय, स्मार्ट मोबाईल्स यांसह मोठ्या प्रमाणावर तांत्रिक साधनसामग्रीची उभारणी करण्यात आल्याचे समजते. पहिल्याच चेंडूपासून मोठ्या पैशांचा खेळ रंगवण्यासाठी सट्टेबाज सज्ज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या सट्टा व्यवहारात शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. ‘पहिल्याच चेंडूवर सिक्सर’ मारण्याच्या मानसिकतेतून लाखो-कोटींची उलाढाल करण्याचे नियोजन आखले जात असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय, काही राजकीय घटकही या सट्टा बाजारात अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. जलद पैसा कमावण्याच्या मोहात अनेकजण या अवैध व्यवसायाकडे वळत असल्याचे दिसत आहे.

सर्वात गंभीर आरोप म्हणजे, या सट्टा रॅकेटमागे पोलिस यंत्रणेलाही ‘मॅनेज’ केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उच्चभ्रू हॉटेलमध्ये कॉकटेल पार्ट्यांच्या आडून सट्ट्याचा हा खेळ रंगत असल्याचेही बोलले जात आहे. मनोरंजनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, यवतमाळची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

क्रमशः

उद्या वाचा हवाला आणि ती पांढरी Activa