
प्रशासनाचा कारवाई चा दणका ,
अमिन शाह
बुलढाणा : जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहावा, यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई सुरू केली आहे. चिखली येथील जालना रोडवरील एका पेट्रोल पंपावर नियमबाह्य पद्धतीने इंधन विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच देणे बंधनकारक आहे. कॅन, बाटल्या किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. मात्र, २६ मार्च २०२६ रोजी चिखलीतील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर या सूचनांकडे दुर्लक्ष करून खुले टँक व बाटल्यांमध्ये इंधन विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकारामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात संबंधित पेट्रोल पंप मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ आणि २८७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कैलास गोपाळराव चाटारकर करीत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना इंधनाची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करत अनावश्यक साठेबाजी टाळण्याचे आवाहन केले आहे













































