Home यवतमाळ 24 तासांत खून प्रकरण उघड, “पती-पत्नी अटकेत”…!

24 तासांत खून प्रकरण उघड, “पती-पत्नी अटकेत”…!

1114
यवतमाळ  –  लाडखेड पोलीस ठाणे हद्दीतील वाघापूर शेतशिवार परिसरात आढळलेल्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत करत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात पती-पत्नीने संगनमत करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास लाडखेड पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम वाघापूर शेतशिवार परिसरात ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर दगडाने ठेचून व चाकूने भोसकून खून केल्याचे स्पष्ट दिसत होते.
तपासादरम्यान मृताची ओळख आतिश सुभाषराव देशमुख (वय ३६, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी पटली. मृताचे काका पंजाबराव मारोतराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा गंभीर असल्याने आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार पोलिसांनी मृतकाचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक तपास व कॉल डिटेल्सचे विश्लेषण केले. या तपासात अंकुश नागोराव खोडे (वय ४३) व त्यांची पत्नी रुपाली अंकुश खोडे (वय ३८, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) यांच्यावर संशय निर्माण झाला.
दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात असे समोर आले की, मृतक आतिश देशमुख याचे रुपाली खोडे हिच्याशी पूर्वी संबंध होते. त्यातून तो तिला वारंवार त्रास देत होता तसेच तिच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून दोन्ही आरोपींनी संगनमत करून १४ मार्च रोजी मृतकाला वाघापूर शेतशिवारात बोलावले. तेथे चाकूने वार करून व दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.
यानंतर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी लाडखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पवन राठोड तसेच बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, पवन ढवळे, अमित झेंडेकर, कविश पाळेकर, दिगांबर पिलावन, महिला पोलीस शिपाई प्रेरणा कांबळे, चालक जितू चौधरी व विवेक पेठे आदी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.