
रविअन्ना जाधव
देउलगावराजा
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला
लगाम घालण्यासाठी आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी टाकून अवैध शस्त्रे आणि जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत एका धारदार तलवारीसह चारचाकी वाहन,असा एक लाख एक हजार तर दुसऱ्या घटनेत जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम, असा एकूण १ लाख ४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत ९ मार्च २०२६ रोजी एक इसम अवैध शस्त्र घेऊन प्रवास करत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देऊळगाव राजा येथील जनता जिनिंगसमोर नाकाबंदी लावली. या नाकाबंदी
दरम्यान संशयित वाहन एमएच-१२-जीएफ-८०६७ क्रमांकाचे वाहन अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये एक तलवार मिळून आली. पोलिसांनी आरोपी राहूल भास्कर झोरे (वय ३३ वर्षे) रा. माळीपुरा, साखरखेर्डा याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १००० रुपये किमतीची तलवार आणि १ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कार, असा एकूण १ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शस्त्रांसोबतच जिल्ह्यातील अवैध जुगार आणि मटका व्यवसायावरही पोलिसांनी प्रहार केला आहे. तामगाव आणि लोणार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण तीन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पातुर्डा येथील मच्छी मार्केट परिसरात ‘भवरी’ नावाचा जुगार खेळणाऱ्या भिमराव श्रावण खंडेराव (वय ५५ वर्षे) याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून १ हजार ३०० रुपये जप्त करण्यात आले आहे , ही कार्यवाही ,
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, प्रताप बाजड, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र अंभोरे, ओमप्रकाश सावळे, शरद गिरी, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, अमोल शेजोळ, दिपक वायाळ, अजीस परसुवाले, मनोज खरडे, निलेश राजपूत आणि महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांनी ही कामगिरी बजावली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.














































