Home विदर्भ वर्धा जिल्ह्यात खैर झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड – वन विभाग सुस्त?

वर्धा जिल्ह्यात खैर झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड – वन विभाग सुस्त?

215
इकबाल शेख वर्धा
9834453404
वर्धा, प्रतिनिधी –  वर्धा जिल्हा येथे खैर या मौल्यवान वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
खैराच्या झाडापासून काथ तयार केला जातो. खैर म्हणजेच झाडाच्या लाकडाच्या गाभ्यातून काथ तयार केला जातो. खैराचे लाकूड छोटे तुकडे करून उकळले जाते त्या उकळलेल्या पाण्यातील अर्क घट्ट करून साचवला जातो थंड झाल्यावर त्यापासून काथ (कॅटचू) तयार होतो. म्हणूनच खैर हे आर्थिकदृष्ट्या मौल्यवान झाड आहे, आणि त्याची बेकायदेशीर तोड मोठ्या प्रमाणावर होत असल्यास त्यामागे काथ निर्मितीचा व्यावसायिक हेतू असण्याची शक्यता असते.
खैर हे औषधी व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे झाड मानले जाते. या झाडाच्या तोडीसाठी वन विभागाची विशिष्ट परवानगी आवश्यक असते. नियमांनुसार झाडांची संख्या, वय आणि जागेचा तपशील देऊन अधिकृत मंजुरी घ्यावी लागते. मात्र, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी कथितरित्या संशयास्पद व अपूर्ण परवानग्यांच्या आधारे हजारो खैराची झाडे तोडण्यात येत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “थातूर-मातूर कागदपत्रे दाखवून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. वन विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने तस्करांचे मनोबल वाढले आहे.”
पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे की खैराच्या झाडांची बेकायदेशीर तोड केल्यास जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच मृदासंवर्धन आणि स्थानिक हवामान संतुलनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे वनमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात वन विभागाकडून अधिकृत भूमिका मिळू शकली नाही. मात्र, वाढत्या दबावामुळे प्रशासन लवकरच कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.