
गाळेधारक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात न्यायालयात
दिग्रस तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने इमारत बाधून त्यातील ११ गाळे विविध व्यावासायीकांना भाड्याने दिले होते. या गाळेधारकांकडे सन २००५ पासून गाळे ताब्यात असून कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळे असलेली इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा घाट घातला आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने ११ हि गाळेधारकांना नोटीस बजावून दुकानाचा ताबा सोडण्याकरीता बजावले होते. या नोटीसीचे विरोधात ४ गाळेधारकांनी अॅड रंजीत अगमे व अॅड निखील सायरे यांचेमार्फत दिग्रस येथील दिवाणी न्यायालयात धाव घेत इमारतीची स्थिती “जैसे थे” ठेवण्याबाबतचे आदेश मिळण्याची विनंती केली. याप्रकरणी पुढील सुनावणी दि. ०६ रोजी होणार असून आता या इमारतीचे भवितव्य आता न्यायालयीन आदेशावर अवलंबून आहे.
दिग्रस तालुक्यातील दिग्रस मानोरा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीने साधारणपणे २० – २५ वर्षापुर्वी इमारत बांधली असून त्यात ११ गाळे काढून ते विविध व्यावसायिकांना भाड्याने दिले होते. हि दुकाने गेली २०-२५ वर्षापासून गाळेधारकांचे ताब्यात असून या दुकानावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीने या गाळेधारकांना नोटीस बजावून सदरचे गाळे रिकामे करण्यास सांगितल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर नोटीसीमधून गाळेधारकांचे गाळे जमीनदोस्त करण्याची भीती निर्माण झाल्याने व या नोटीसीमधून भविष्यात बांधावयाच्या इमारतीमध्ये जुन्या गाळेधारकांना स्थान मिळेल किंवा नाही, याचा कोणताही खुलासा कृषी उत्पन्न बाजार समितीने न केल्याने अखेरीस ४ गाळेधारकांनी दिग्रस येथील दिवाणी न्यायालयात धाव घेत या इमारतीची स्थिती “जैसे थे” ठेवण्याबाबतचे आदेश मिळण्याची विनंती केली होती. प्रस्तुत प्रकरणी दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होऊन पुढील सुनावणी दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या इमारतीचे भवितव्य आता न्यायालयीन आदेशावर अवलंबून आहे. या प्रकरणी न्यायालय काय आदेश पारीत करते, याकडे दिग्रस वासियांचे लक्ष लागलेले आहे.












































