Home यवतमाळ “विकसित भारताच्या दिशेने ठोस पाऊल” — मा. संजय राठोड यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

“विकसित भारताच्या दिशेने ठोस पाऊल” — मा. संजय राठोड यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

289
आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प 2026-27 हा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा विस्तार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा दूरदृष्टीचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मंत्री संजय राठोड यांनी दिली.
ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयाकडे नेणारा स्पष्ट रोडमॅप सादर करतो. रेकॉर्ड भांडवली खर्च, रेल्वे, लॉजिस्टिक्स, जलमार्ग, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.
विशेषतः जलव्यवस्थापन, सिंचन, नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन आणि शाश्वत शेती यावर दिलेला भर अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेती उत्पादनक्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मृदा व जलसंधारणास पूरक धोरणे भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधन सुरक्षित ठेवणारी ठरतील.
MSME, सेमीकंडक्टर मिशन, बायोफार्मा, टेक्सटाईल आणि डिजिटल-AI उपक्रम यांमुळे उद्योग व रोजगार निर्मितीला चालना मिळेल. तरुणांसाठी कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाधारित संधी वाढविण्यावर सरकारचा स्पष्ट भर दिसतो.
कररचनेत स्थिरता राखत मध्यमवर्गाला दिलासा, तसेच पायाभूत सुविधांवरील मोठ्या गुंतवणुकीमुळे देशांतर्गत मागणी आणि विकास दोन्ही मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक ताळेबंद नसून गरीब, शेतकरी, कामगार आणि तरुणाईच्या आशाआकांक्षांना बळ देणारा विकासाचा आराखडा आहे. माननीय पंतप्रधान आणि वित्तमंत्री यांचे मी अभिनंदन करतो,” असेही मा. राठोड यांनी सांगितले.