Home यवतमाळ हॉटेल जसराज ओबेराय (रेडिसन ब्ल्यू) मध्ये भरली मायेची थाळी; अनाथ, वंचित व...

हॉटेल जसराज ओबेराय (रेडिसन ब्ल्यू) मध्ये भरली मायेची थाळी; अनाथ, वंचित व निराश्रित बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

444
यवतमाळ  – जिल्ह्यातील बालगृह यवतमाळ, वणी व पुसद येथील अनाथ, वंचित व निराश्रित बालके काही कार्यक्रमानिमित्त यवतमाळ येथे आली असताना त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. यवतमाळ बालकल्याण समितीच्या पुढाकाराने या बालकांना शहरातील नामांकित हॉटेल जसराज ओबेराय (रेडिसन ब्ल्यू) येथे स्नेहभोजनासाठी नेण्यात आले.
या स्नेहभोजनावेळी बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा होता. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या भव्य व आलिशान हॉटेलमध्ये येण्याचा अनुभव मिळाल्याने मुले व मुली अत्यंत उत्साही व आनंदित दिसून येत होती. हॉटेलच्या सजावटीपासून ते आदरयुक्त सेवाभावापर्यंत प्रत्येक गोष्ट बालकांसाठी नवी व सुखावणारी ठरली.
संपूर्ण हॉटेलची पाहणी करताना तसेच विविध चविष्ट पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेताना बालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. “आयुष्यात पहिल्यांदा असे काही अनुभवायला मिळाले,” अशा भावनिक प्रतिक्रिया बालकांनी यावेळी व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे केवळ जेवणच नव्हे, तर मायेची, आपुलकीची आणि समाजाकडून मिळणाऱ्या प्रेमाची अनुभूती बालकांना मिळाली. यवतमाळ बालकल्याण समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.