Home बुलडाणा लाइन चे तार टाकत असतांना युवक खड़कपुरना नदित वाहून गेला ,

लाइन चे तार टाकत असतांना युवक खड़कपुरना नदित वाहून गेला ,

197

 

एन डी आर एफ च्या टीम कडून शोध सुरु ,

अमिन शाह

बुलडाणा ,

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी शिवारातील राहेरी कट्ट्याजवळ खडकपूर्णा नदीपात्रात लाईनचे काम सुरू असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती नदीपात्रात उतरून काम करत असलेला २२ वर्षीय युवक पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गौतम अंबादास गवई (वय २२, रा. ताडशिवणी) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गौतम गवई हा राहेरी कट्ट्याजवळ नदीपात्रात लाईनचे काम करत होता. कामादरम्यान अचानक पाण्याची खोली आणि प्रवाह वाढल्याने तो पाण्यात अडकला आणि काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधकार्य सुरू केले; मात्र आज सायंकाळपर्यंत युवकाचा शोध लागू शकला नाही.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राहेरी बु. येथील ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ पवार यांनी तात्काळ प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयास सादर केला. त्यानंतर तहसीलदार अजित दिवटे यांनी सदर घटनेची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कोणताही विलंब न करता अत्याधुनिक साधनसामग्रीसह NDRF पथक घटनास्थळी रवाना केले. NDRFचे प्रशिक्षित जवान खडकपूर्णा नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत असून नदीतील अधिक खोली आणि प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. तरीही युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे तहसील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर व त्यांचे सहकारी कर्मचारी सुरुवातीपासून घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्याला सहकार्य करत असून, परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील याची खबरदारी घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे ताडशिवणी, राहेरी व परिसरात शोककळा पसरली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. युवकाचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा नातेवाईकांसह संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे या संदर्भात तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाल नाही ,