Home बुलडाणा कृषी विभागाच्या खत बांधावर वाटप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाला लाभ

कृषी विभागाच्या खत बांधावर वाटप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाला लाभ

172

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही :– महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी निविष्ठा वितरक यांच्या संयुक्त समन्वयातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अत्यावश्यक निविष्ठा ( रासायनिक खते) थेट उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा फायदा सरंबा येथील “जय हनुमान शेतकरी बचत गट” याने घेतला असून, गावात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत शेतकरी बचत गटांनी कृषी विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक निविष्ठा थेट शेताच्या बांधावर उपलब्ध करून घेतल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळ व पैसा वाचण्यासोबतच निविष्ठा वेळेवर मिळाल्यामुळे शेती कामकाजात अडथळा न येता योग्य नियोजन करता येणार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी, श्री तुषार वाघ, तालुका कृषी अधिकारी श्री भगवान कचवे, कृषी अधिकारी श्री विजय सरोदे,  तसेच उप कृषी अधिकारी श्री विनायक मेहेत्रे, श्री विठ्ठल धांडे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री विकास घुसळकर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत आहे. निविष्ठा थेट बांधावर उपलब्ध करून देणे हा उपक्रम शेतकऱ्यांच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल ठरेल.”
“जय हनुमान शेतकरी बचत गटाचे” अध्यक्ष श्री. विकास चेके यांनी यावेळी आपला अनुभव सांगताना सांगितले की, “आम्ही गटाच्या माध्यमातून कृषी विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या सहकार्याने आम्हाला शेतातच निविष्ठा मिळाल्या. यामुळे आम्ही बाजारात जाऊन खरेदी करण्याचा वेळ, खर्च आणि वाहनाची आवश्यकता वाचवू शकलो.”
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना योग्य मार्गदर्शन, सवलतीचे दर, गुणवत्तेची खात्री आणि पारदर्शक व्यवहार याची पूर्तता केली जात आहे. गटाच्या सदस्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पुढेही अशाच प्रकारे सहकार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये बचत गटांबाबत विश्वास वाढत असून सामूहिक प्रयत्नातून अधिक चांगले परिणाम मिळू शकतात, हे अधोरेखित झाले आहे. भविष्यात अन्य गटांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. तसेच परिसरातील इतर शेतकरी गटांनी सुद्धा या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन  मारुती कृषी सेवा केंद्र देऊळगाव महीचे संचालक श्री प्रभाकर मुंडे यांनी केले.
याप्रसंगी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक निविष्ठा जसे रासायनिक खते थेट शेताच्या बांधावर उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बचत गटांनी पुढे यावे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात निविष्ठा मिळतील. मध्यस्थांचा खर्च टळेल व शेतकऱ्यांचा नफा वाढेल. बचत गटांनी एकत्र येऊन निविष्ठा खरेदी व वितरणाची जबाबदारी घ्यावी. यामुळे गटाची आर्थिक क्षमता वाढेल आणि गावपातळीवर शाश्वत शेती व्यवस्था उभी राहील. शेतकरी बचत गट हे ग्रामीण भागातील शेती सशक्तीकरणाचे महत्वाचे साधन ठरू शकतात. असे आवाहन उपकृषि अधिकारी विनायक मेहेत्रे यांनी केले.