
यवतमाळ – “दारू तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री, नियमांचे उल्लंघन, आणि शासन महसुलाची उघडपणे लूट चालू आहे – आणि हे सगळं होतंय प्रशासनाच्या आणि उत्पादन शुल्क विभागाच्या मूक संमतीने!” असा घणाघात व्हिसल ब्लोअर रजनीकांत बोरेले यांनी एका पत्रकार परिषद मध्ये केला.
बोरेले यांनी एफ.एल.-2 वाईन शॉप्स, एफ.एल.-3 बिअर बार, आणि देशी दारू दुकानांमध्ये खुलेआम नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट केले. परवाना अटींचा भंग करत रात्री उशिरापर्यंत बिनधास्तपणे विक्री सुरू असून, दररोज लाखो रुपयांची बेकायदेशीर उलाढाल केली जात आहे. विशेष म्हणजे हे सगळं होत असताना संबंधित अधिकारी डोळेझाक करत आहेत – की हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत?
कोणाच्या आशीर्वादाने चालतोय दारूचा ‘खुल्लमखुल्ला’ धंदा?
बोरेले यांनी आरोप केला की, विभागीय अधिकार्यांच्या मर्जीनेच या दुकानांना “अबाधित संरक्षण” मिळत असून, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग दोघेही या अवैध व्यवहारांवर कारवाई करण्यास असमर्थ – की अनिच्छुक? – आहेत.
त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वाईन शॉप्स रात्री 10.30 पर्यंत, बिअर बार 11.30 पर्यंत, तर देशी दारू दुकाने रात्री 11.00 पर्यंत बिनधास्त चालू असतात. स्थानिक जनतेच्या तक्रारी, कायद्याच्या अटी आणि वेळा – सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवलेल्या आहेत.
राजकारण, अधिकार्यांचे पाठबळ आणि माफिया युती?
बोरेले यांनी स्पष्टपणे म्हटले की, काही राजकीय नेते आणि अधिकार्यांचे छुपे आशीर्वाद या दारू माफियांना मिळत आहेत. शासन महसुलाचे कोट्यवधींचे नुकसान, सामाजिक अराजक आणि तरुणांचा विनाश – याला जबाबदार कोण?
31 डिसेंबरला तर दारूच्या विक्रीचा कहरच!
31 डिसेंबर 2024 च्या रात्री मोठ्या प्रमाणावर दारू विक्री झाली असून, पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग यांचे पूर्णपणे नियंत्रण हरवले होते. बोरेले यांच्या म्हणण्यानुसार, हा सर्व प्रकार “योजना बद्धरित्या” केला गेला असून यामागे सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध आहेत.
आता पुरेसे झाले!
रजनीकांत बोरेले यांनी मुख्यमंत्र्यांकडे,गृह विभागाकडे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार सादर करत कठोर चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दोषी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची सेवा समाप्त करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.












































