अमीन शाह
चिपळूण येथील मुंबई गोवा महामार्गावर फरशी तिठा येथे खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दोन वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संदीप पवार, विजय मोरे, मनोज मिरजोळकर, सुनील मालुसरे, आत्माराम सापटे ह्यांना ताब्यात घेतलं आहे. सर्व आरोपी खेड मंडणगड चिपळूण परिसरातील आहेत. त्यांच्याजवळ दोन जिवंत खवले मांजर सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या दोन्ही खवल्या मांजरांची किंमत खूप मोठी आहे. या दोन खवल्या मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ८० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशाप्रकारे खवल्या मांजरांची तस्करी होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पाळत ठेवली होती. आरोपी व्यवहार करण्यासाठी तेथे आल्यावर पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. दरम्यान हस्तगत केलेल्या खवले मांजरांना चिपळूण पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर वनविभागाने खवले मांजरांना नैसर्गिक अधिवासात सोडले.