Home यवतमाळ “सावधान” तुमचे प्लॉट खरेदी करताना कायदेशीर बाबी तपासा, भूमाफियांपासून सावध रहा!

“सावधान” तुमचे प्लॉट खरेदी करताना कायदेशीर बाबी तपासा, भूमाफियांपासून सावध रहा!

449

यवतमाळ (प्रतिनिधी) – सध्या यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्लॉट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची धावपळ सुरू आहे. अनेकजण कष्टाने साठवलेल्या पैशातून आपले स्वप्नातील घर उभारण्यासाठी प्लॉट खरेदी करत आहेत. मात्र, या धावपळीच्या आणि उत्साहाच्या गडबडीत एक अत्यंत महत्त्वाची बाब दुर्लक्षित होत आहे — प्लॉटचे कायदेशीर अस्तित्व आणि मूळ कागदपत्रांची खात्री.

यवतमाळ जिल्ह्यात सध्या भूमाफियांकडून मनमानी कारभार सुरू आहे. अपूर्ण सुविधा असलेले, विकास आराखड्यात नसलेले किंवा कायदेशीर प्रक्रियेत गोंधळ असलेले प्लॉट नागरिकांना विकले जात आहेत. काही ठिकाणी तर एकाच प्लॉटवर अनेक मालक तयार करण्याचे प्रकार समोर येत आहेत.

भूमाफियांनी अप्रशासकीय lay-outs तयार करून, नागरिकांना स्वप्न दाखवून प्लॉट विक्री केली आहे. परंतु या प्लॉटवर पाणी, वीज, रस्ता यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. शिवाय नंतर न्यायालयीन वाद उभे राहण्याची शक्यता असते. काही ठिकाणी नगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी न घेताच प्लॉट विक्री केली जात असल्याचेही उघड झाले आहे.

पोलिस आणि प्रशासनही सतर्क
यवतमाळ पोलिस विभागाकडून वेळोवेळी भूमाफियांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणताही प्लॉट खरेदी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यात विशेषतः 7/12 उतारा, फेरफार नोंद, lay-out मंजुरी पत्र, NA ऑर्डर, नगरपालिका मंजुरी, तसेच मालकी हक्काबाबतचे संपूर्ण कागदपत्रे तपासावीत.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

प्लॉट खरेदी करण्यापूर्वी संबंधित गाव कार्यालय, तहसील कार्यालय किंवा नगरपालिका येथे खात्री करून घ्या.

योग्य त्या वकील किंवा जमीन तज्ज्ञाची मदत घ्या.

प्लॉट प्रॉपर्टीवर कोणताही वाद नाही ना याची माहिती घ्या.

जमिनीचा वापर हेतू (agricultural/commercial/residential) तपासा.

ज्या कंपनी किंवा व्यक्तीकडून प्लॉट घेत आहात, त्यांच्या मागील विक्रीचा इतिहास तपासा.’उठा, उघडा डोळे!’
सर्व नागरिकांनी सजग राहूनच व्यवहार करावा. फक्त भावनेपोटी किंवा कमी किंमतीच्या आमिषाने फसून जाऊ नये. कष्टाचा पैसा एका चुकीच्या निर्णयामुळे वाया जाऊ नये म्हणून प्रत्येकाने ‘वाचत रहा पोलिस वाला’ ह्या संदेशाप्रमाणे सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.