
यवतमाळ,दि.५ मार्च (बुधवार):
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच स्व.संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून,या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसने दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून IPC कलम ३०२ अंतर्गत कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.
हत्या का झाली?
संतोष अण्णा देशमुख यांनी पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या लोकांचा विरोध केला होता. याच कारणामुळे ९ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड यांचे नाव समोर आले आहे. कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात CID कार्यालयात आत्मसमर्पण केले.मात्र,त्याआधी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपल्यावरील आरोप फेटाळले.
युवक काँग्रेसने या हत्याकांडामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करत,धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर IPC ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आज दिनांक ५ मार्च २०२५ (बुधवार) रोजी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे, शुभम शेंडे, आयुषी देशमुख, विद्या परचाके, मंगला सोयाम, प्रतीक नार्लावार, निशांत नैताम, वृषभ गुल्हाने, कॉम्रेड सचिन मनवर, फैसल पटेल, प्रिया काळे, प्रथम चव्हाण, नेहा डाखोरे, प्रा. पंढरी पाठे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासन यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












































