
यवतमाळ,दि.19 – यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार आणि डेंग्यूसारख्या घातक रोगांनी डोके वर काढले आहे.डेंग्यूमुळे अनेकांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.खासगी रुग्णालयांचा प्रचंड खर्च परवडत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.मात्र,रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि रिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत आहेत.यात जिल्ह्याबाहेरील रुग्णांचाही समावेश आहे.मात्र,डॉक्टर,परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने उपचार प्रक्रियेत अडथळा येत आहे.विशेषतः प्रसूतीगृहातील सुविधांची स्थिती दयनीय आहे.गर्भवती महिलांना तातडीची मदत मिळत नसल्याने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था देखील चिंताजनक आहे. आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वाच्या साधनांचा अभाव असून,रुग्णांचे हाल वाढत आहेत.
कोट —–
शासकीय रुग्णालये ही सर्वसामान्य जनतेसाठी आधारस्तंभ आहेत. मात्र,अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची स्थिती गंभीर बनत आहे.शासनाने यावर गांभीर्याने विचार करून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केली नाही तर याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतील.प्रशासनाने तातडीने पावले उचलून शासकीय रुग्णालयांची परिस्थिती सुधारावी,अशी जनतेची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.
सोशल एक्टिविस्ट – सचिन मनवर











































