पोलीसवाला टीम ,
गणेशोत्सव काळात लेसर लाईटचा झगमगाट अन्
डीजेचा दणदणाट पाहाया मिळतो. काल गणेश आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात काढण्यात आल्या होत्या. मात्र याच मिरवणुकीमध्ये लेसर किरणांच्या प्रखर विद्युत झोतामुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होऊन दुखापत झालेली आहे एक पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाला आहे ,
काल राज्यभरात लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगावमध्येही काल गणेश आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. अनेक जण गणेश आगमन मिरवणूक पाहण्यासाठी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
उचगाव गावातील 21 वर्षीय तरुण आदित्य पांडुरंग बोडके हा देखील ही मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. या
मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युतझोताची किरणे थेट डोळ्यावर
पडल्याने या तरुणाचा डोळा लाल झाला. त्यातून रक्त वाहू लागल्यानंतर त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात
आणले असता त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा होऊन आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
या तरुणावर काल रात्री एका खाजगी रुग्णालयात उपचार करून त्याला पुन्हा घरी सोडण्यात आले आहे. या तरुणाच्या डोळ्यांवर प्रखर लेसर किरणांचा मारा झाल्यामुळेच इजा झाल्याचा दावा या तरुणाचे वडील पांडुरंग बोडके यांनी केलेला आहे. दुसरीकडे बलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. युवराज पाटील यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.