
- ➡️ घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन कोठारी व उप सभापती सचिन देशमुख पारवेकर पदावर कायम..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी, उपसभापती सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांची निवड प्रक्रिया ही अनेक नियमांना डावलून बेकायदेशीर करण्यात आली असून ती प्रक्रिया रद्द करुन पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, सदर प्रकरणात 2 जुन रोजी सुनावणी घेण्यात आली. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व ईतर 7 संचालकाचे अपील यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी खारीज केले आहे. या मुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भैय्या उर्फ नितीन कोठारी, उप सभापती पदी सचिन देशमुख पारवेकर हे पदावर कायम आहे.
घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे (आमडी), आशिष लोणकर (शिरोली), आशिष भोयर (अंजी (नृसिंह)), गुणवंत लेणगुरे (मानोली), अरविंद जाधव (घाटंजी), अकबर तंवर (घाटंजी), रमेश डंभारे (आमडी) व कैलास कोरवते (शिरोली) आदींनी प्राधिकृत अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती एस. व्ही. कुडमेथे, सभापती भैय्या उर्फ नितीन कोठारी, उप सभापती सचिन देशमुख पारवेकर यांचे विरुद्ध यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांचे कडे अपिल दाखल केले होते.
सदर प्रकरणात सुनावणीची नोटीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (रा. आमडी), यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष व संचालक तथा संचालक आशिष सुरेशबाबु लोणकर (रा. शिरोली), आशिष भोयर (रा. अंजी (नृसिंह)), गुणवंत लेणगुरे (रा. मानोली), सर्विद जाधव (रा. घाटंजी), अकबर तंवर (रा. घाटंजी), रमेश डंभारे (रा. आमडी), कैलास कोरवते (रा. शिरोली) आदीं संचालकांना बजावण्यात आली होती.
ज्या अर्थी अर्जदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व ईतर 7 यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 22 (4) नुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ कार्यालयात प्रकरण दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात 2 जुन रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय (यवतमाळ) नानासाहेब चव्हाण यांच्या समक्ष सुनावणी करिता ठेवण्यात आली होती. त्या अर्थी संबंधित 8 संचालकांना तसेच सभापती व उपसभापती यांना सुचित करण्यात येते की, प्रस्तुत प्रकरणाचे सुनावणीसाठी उपरोक्त तारखेस या कार्यालयात उपस्थित राहुन किंवा आपले वकीलामार्फत आपले लेखी म्हणने 2 प्रतित दाखल करावे. तसेच आपल्या म्हणण्याच्या पृष्ठार्थ आवश्यक ती कागदपत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रेकार्ड व या प्रकरणांशी संबंधित मुळ रेकार्ड सुनावणीच्या वेळेस सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे सुनावणी नोटीस मध्ये नमुद केले आहे.
दरम्यान, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाची निवड करिता उपविधी क्रमांक 36 व 41 मधील तरतुद लागू होत नसुन प्राधिकृत अधिकारी तथा पिठासीन अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन कुडमेथे यांना प्राप्त विवेकाधिकाराचा (Discretionary Power) वापर करून सभापती व उपसभापती पदासाठी बहुमताने आवाजी मतदान घेण्याच्या नितीन कोठारी व इतर 9 संचालक यांचा अर्ज मंजूर करण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती निवडीच्या विधिग्रह्याते बाबत दाखल वादी यांचा दावा कायदेशीररित्या अयोग्य असुन फेटाळने क्रमप्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 22 (4) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ वादी श्री. अभिषेक ठाकरे व ईतर 7 संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी यांचा दिनांक 19 मे रोजीचा अपील अर्ज खारीज करण्यात येत असुन प्रतिवादी क्रमांक 1 यांनी दिनांक 19 मे रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवड सभा वैद्य असल्याचे जाहीर करीत आहे, असा आदेश यवतमाळचे जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी पारित केला आहे.













































