
वाघाडी येथे जैवविविधता दिनानिमीत्त आयोजन

यवतमाळ (प्रतिनिधी) स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमीत्ताने निसर्गचित्र स्पर्धा आणि सीडबाँल निर्मीती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त नदी साक्षरतेसाठी सुरु असलेल्या जल व जनजागृतीकरिताच्या चला जाणुया नदिला उपक्रमांतर्गत वडगाव रोड, गुरुद्वारा जवळील वाघाडी नदी येथे ३८ आठवड्यांपासुन श्रमदान सुरु आहे. याअंतर्गत रविवारी २१ मे २०२३ ला सकाळी ठीक ७ वाजता या स्पर्धा होणार आहेत. चित्रकला स्पर्धेसाठी पाचवीपर्यत, दहावीपर्यत आणि महाविद्यालयीन असे तीन गट करण्यात आले असुन सीडबाँल निर्मीती स्पर्धेसाठी वैयक्तिक आणि समुह असे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात प्रथम, द्वितिय, तृतीय अशी तीन बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धकांना दोनही स्पर्धांकरिता ड्राँईंगशीट, माती, पाणी, बियाणे हे साहित्य आयोजकांमार्फत पुरविण्यात येणार असुन कलर्स आणि हार्ड बोर्ड हे साहित्य स्पर्धकांनी आणायचे आहेत. विजेत्यांना प्रशस्तीपत्र, पर्यावरण पुस्तक, डायरी, पेन, रोपाची कुंडी समारंभपुर्वक देण्यात येणार आहे. कृपया या स्पर्धेत प्रत्येक वयोगटातील यवतमाळकर पर्यावरणस्नेहींनी आवर्जुन सहभागी व्हावे अशी विनंती अभियानांतर्गतच्या आयोजक संस्था, संघटनांनी केली आहे.












































