
यवतमाळ//प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात नदीपात्रातील रेती घाटाचा लिलाव आजस्तोवर झाला नसल्याने शिरपूर, हिवरा (दरणे), सातेफळ, गलमगांव, टालेगांव आदि रेती घाटांवर रेती तस्करांचे महसूल विभागांसह स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु असल्याचे दिसते.
महसूलच्या तहसीलदारांसह बरेचसे कर्मचारी,अधिकारी हे जिल्हाच्या ठिकाणी राहात असल्याने रेती चोरट्यांना जणू रानं मोकळेच करून दिले असल्याचे दिसून येते. एखाद्याने अवैध रेती उत्खनन होत असल्याची महसूल विभागाला माहिती दिली तरी रात्रीच्या वेळी जिल्ह्यातुन कोणताही अधिकारी येणार नाही. आणि जर का येण्याचे सौजन्य दाखविलेच तर तोपर्यंत रेती तस्कर गाडी खाली करुन पोबारा होतात. अश्यातच शासकिय सुट्टीच्या दिवशी तर रेती तस्करांना साहजिकच संपूर्ण रेतीघाट आपल्याच मालकीचे असल्यागत वाटते.
महसूल कार्यालयातीलच काही कर्मचारी हे अर्थपूर्ण संबंधातून साहेबांच्या लोकेशन्सची अचूक माहिती देत असतात. त्यामुळे रेती तस्करांचे घाटावर गाडी जातांना व गाडी लोड करून नदीपात्रातून काढतांना अधिकाऱ्यांचे लोकेशन घेऊनच ये-जा करीत असतात. घाटातून गाडी काढतांना रेती तस्करांचे फंटर मोटरसायकलवर किंवा चारचाकी वाहनाने समोर रस्ता मोकळा आहे की नाही याची माहिती खात्रीपूर्वक देत असतात. त्यानंतरच रेतीची बिनधास्तपणे विल्हेवाट लावण्यात येते. मागिल चार महिन्यांपासून अवैध रेतीचे उत्खनन सुरूच असल्याने अर्ध्यापेक्षा जास्त रेती घाट खाली करून मोकळे झाले आहेत.
दररोज सकाळी बांधकामांवर रात्रीतून टाकलेल्या ओल्या रेतीचे ढिगारे पहायला मिळते. मागिल दोन महिन्यांपूर्वी अशाच एका अवैध रेतीची चोरी करणाऱ्यांच्याच खबऱ्यांनी कळंब तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण यांना दिलेल्या माहितीवरून एकाच आठवड्यात दोन ट्रेझर बोट वर्धा नदी पात्रातील शिरपूर, गलमगांव रेती घाटातून पकडल्या होत्या हे विशेष. मात्र त्या ट्रेझर बोटीवर मालकी हक्क कुणीच दाखविला नसल्याने बेवारस म्हणून कारवाई केल्याने त्या तहसील कार्यालयातच सडत आहे.
यामध्ये रेती तस्करांचे मंडळ अधिकारी, नदीकाठावरील हलक्यातील तलाठी यांसह स्थानिक पोलीसांशी देखील सुमधुर संबंध असल्याने दिवसाआड धाब्यांवर ओल्या पार्टीच्या मेजवानीसह विशेष अर्थपूर्ण सहाय्य निधी पुरविल्या जात असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून रेती तस्करी जोमात सुरू आहे. यातील काही रेती तस्करांचे रात्री १ नंतर ठिय्या वरुन जेसीबी व हायवा ट्रक घाटावर निघत असून पहाटे ४ वाजेपर्यंत आपले काम फत्ते करुन मोकळे होतात. यातून रेती तस्कर गब्बर बनले असून महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांसह काही स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा रेती तस्करांच्या पाठीशी वरदहस्त आहे तोपर्यंत यांना कोणीच रोखू शकत नाही हे परमसत्य असले तरीही राळेगाव उपविभागीय अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन रेती चोरीला आळा घालून शासनाचा बुडणारा करोडो रुपयांचा महसूल वाचवावा अशी नागरीकांची मागणी आहे.











































