Home यवतमाळ “राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राजाश्रय द्या” – ग्रंथमित्र डॉ. गजानन कोटेवार

“राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राजाश्रय द्या” – ग्रंथमित्र डॉ. गजानन कोटेवार

204

 

यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे ४० वे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

ग्रंथदिडीने वेधले बाभुळगावकरांचे‌ लक्ष

जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांची भरघोस उपस्थिती

बाभुळगाव शहरातून काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी वृंद, अधिवेशनाला मार्गदर्शन करताना मान्यवर


दि. २१ नोव्हेंबर बाभुळगाव

“महाराष्ट्र राज्य नेहमीच पुरोगामी विचारांना पुढे नेण्याचे धोरण राबवते. याच विचारातून राज्य सरकारने “गाव तिथे ग्रंथालय” धोरण तयार केले. परंतु राज्यभरात उभारलेल्या या ग्रंथालयांना राजाश्रय न मिळाल्याने अनुदान वाढ, दर्जा वाढ, नविन शासन मान्यता, किमान वेतन अशा अनेक प्रश्नांमुळे‌ कित्येक वाचनालयांना घरघर लागली आहे. कित्येक ग्रंथपालांनी आपले आयुष्य देखील संपवले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हि बाब नक्कीच भुषावह नाही. राज्य शासनाने आपले पुरोगामित्व सिद्ध करीत मेटाकुटीला आलेल्या सार्वजनिक वाचनालयांना राजाश्रय द्यावा”, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र डॉ गजानन कोटेवार यांनी केले.

श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय नायगाव व बाभुळगाव तालुक्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालये व यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक महल्ले मंगल कार्यालय येथे यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे ४० वे वार्षिक अधिवेशन दि. २० रोजी पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन अरविंद ढोणे, सहाय्यक ग्रंथालय संचालक, अमरावती यांचे हस्ते तर शामरावजी वाहूरवाघ, अध्यक्ष अमरावती विभागीय ग्रंथालय संघ यांचे प्रमुख उपस्थितीत व ग्रंथमित्र डॉ. गजानन कोटेवार, अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रंथालय संघ यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र कोरे जिल्हा ग्रंथपाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ अजय सिरसाट, वरीष्ठ लिपिक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे सह यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम अधिवेशन स्थळापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीला यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब यांनी हिरवी झेंडी दाखवली.

अधिवेशनाचे सुरूवातीला व्यासपीठावरील मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून सार्वजनिक ग्रंथालयांचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अधिवेशनाचे उद्घाटन करताना उद्घाटक अरविंद ढोणे यांनी उपस्थित सार्वजनिक ग्रंथालयीन पदाधिकारी व कर्मचारी वृंंदांना मार्गदर्शन केले. ग्रंथालयांकडून असलेल्या अपेक्षा व त्यांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती लाभलेले अमरावती विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघ यांनी “राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना नियमित वेतन: अडचणी व वाटचाल” या विषयावर आपले विचार मांडले.

अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात खुल्या अधिवेशनाला ग्रंथमित्र विनोद देशपांडे, डॉ. अशोक फुटाणे यांनी मार्गदर्शन केले. मनोज रणखांब यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले तर प्रशांत पंचभाई यांनी ठराव वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. निखिल सायरे यांनी तर संघाचा अहवाल प्रशांत पंचभाई यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुषण ब्राम्हणे यांनी तर आभारप्रदर्शन नागेश गांधे यांनी केले. अधिवेशनाला जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दिलीप कावळे, प्रल्हाद इंगळे, आनंद आडे, कुश राठोड, सचिन निलपवार, ज्योती सोनटक्के, सुरेश रामटेके, राजेश खोडके, राजेंद्र रामटेके, खोब्रागडे, दिनेश रोकडे, मनोज पांडे, पद्माकर राऊत, सुरेश भोंडे, उषा सायरे, भारत राठी आदींनी परिश्रम घेतले.

चौकटचा मजकूर
ग्रंथालय चळवळीतील महर्षींचा जीवन गौरव सन्मान

राज्यात ग्रंथालय चळवळीची सुरुवात झाल्यानंतर ग्रंथमित्र डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र राम देशपांडे, ग्रंथमित्र रामजी राऊत व ग्रंथमित्र विनोद देशपांडे यांनी चळवळीकरीता आपले आयुष्य वेचले. त्यांनी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर विविध पदांवर काम करून ग्रंथालय चळवळीला नवी दिशा. त्यांचे सन्मानाप्रित्यर्थ यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाने त्यांना जीवन गौरव सन्मान देऊन गौरवले.