Home यवतमाळ घाटंजी येथील रेती तस्करी प्रकरणातील आरोपी घाटंजीचे माजी नगरसेवक शाम खांडरे, अक्षय...

घाटंजी येथील रेती तस्करी प्रकरणातील आरोपी घाटंजीचे माजी नगरसेवक शाम खांडरे, अक्षय मस्के इतरांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडुन जामीन मंजूर..!

517

( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील मानोली फाटा ते सोनु मंगलम रोड नजीक रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर तेथेच खाली करुन सोबत असलेल्या कर्मचाऱ्याच्या खिशातुन मोबाईल हिसकावुन ट्रॅक्टर घेऊन पळुन गेल्या प्रकरणी घाटंजीच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पुजा शिवराम मातोडे (TAHSILDAR PUJA MATODE) यांच्या जबानी रिपोर्ट वरुन घाटंजी येथील भाजपाचे शहर अध्यक्ष तथा घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बालु उर्फ राम खांडरे (RAM KHANDRE) यांचे बंधू माजी नगरसेवक शाम खांडरे (वय 47), विक्की उर्फ अक्षय मस्के (वय 24) व शुभम शाम खांडरे (वय 25) या तिघां विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 594/2022 भादंवि कलम 353, 392, 506 व 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते.

सदर प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी घाटंजी पोलीस ठाण्यातील पथक प्रयत्नशील असतांनाच आरोपी मात्र फरार होण्यास यशस्वी झाले होते. दरम्यान, सदर प्रकरणात विक्की उर्फ अक्षय मस्के व ईतर दोघांनी यवतमाळच्या जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डाॅ. गौरी कवडीकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात आज मंगळवार रोजी न्यायालयात सुनावणी झाली. ॲड. राजेश साबळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डाॅ. गौरी कवडीकर यांनी जामीन मंजूर केला आहे.
आरोपीतर्फे अँड. राजेश साबळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

सदर प्रकरणाचा तपास घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे (PI MANISH DIWTE) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे (PSI SHASHIKANT NAGARGOJE) यांनी तपास केला होता.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोली फाटा ते सोनु मंगलम रोडने रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार पुजा मातोडे (Tahsildar Puja Matode) यांच्या पथकाने रस्त्यात थांबवुन रेतीची परवानगी आहे कां अशी विचारणा केली होती. मात्र, ट्रॅक्टर चालकाने तहसीलदाराशी हुज्जत घालुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप आहे. सोबत असलेल्या कर्मचाऱ्याच्या खिशातुन मोबाईल जबरीने हिसकावुन काढुन घेतला. तसेच रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर तेथेच खाली करुन ट्रॅक्टर घेऊन पळुन गेले, अशा तहसीलदार पुजा मातोडे यांच्या जबानी रिपोर्ट वरुन घाटंजी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते.

तथापि, जिल्हा व सत्र न्यायालयात (DISTRICT SESSION JUDGE) दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर 4 ऑक्टोंबर रोजी सुनावणी असल्याने काय निर्णय लागेल या कडे घाटंजी तालुक्यातील राजकीय नागरिकांचे लक्ष लागले होते. सदर प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे (Psi Shashikant Ngargoje) हे करित आहे.