Home यवतमाळ घाटंजी तहसीलदाराच्या तक्रारी वरुन माजी नगरसेवक व अन्य दोघां विरुद्ध घाटंजी पोलीस...

घाटंजी तहसीलदाराच्या तक्रारी वरुन माजी नगरसेवक व अन्य दोघां विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल..!

413

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी : घाटंजी तालुक्यातील मानोली फाटा ते सोनु मंगलम रोड नजीक रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर तेथेच खाली करुन सोबत असलेल्या कर्मचाऱ्याच्या खिशातुन मोबाईल हिसकावुन ट्रॅक्टर घेऊन पळुन गेल्या प्रकरणी घाटंजीच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पुजा शिवराम मातोडे यांच्या जबानी रिपोर्ट वरुन घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बालु उर्फ राम खांडरे यांचे बंधू माजी नगरसेवक शाम खांडरे (वय ४७), विक्की उर्फ अक्षय मस्के (वय २४) व शुभम शाम खांडरे (वय २५) या तिघां विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५९४/२०२२ भादंवि कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा निर्माण करणे), ३९२ (जबरी चोरी), ५०६ (जिवे मारण्याची धमकी देणे) व ३४ (संगणमत करणे) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

सदर प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नसुन आरोपी मात्र फरार असल्याचे समजते. सदर प्रकरणाचा तपास घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे करित आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोली फाटा ते सोनु मंगलम रोडने रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदाराने रस्त्यात थांबवुन रेतीची परवानगी आहे कां अशी विचारणा चालकाला केली होती. मात्र, ट्रॅक्टर चालकाने तहसीलदाराशी हुज्जत घालुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सोबत असलेल्या कर्मचाऱ्याच्या खिशातुन मोबाईल जबरीने हिसकावुन काढुन घेतला. तसेच रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर तेथेच खाली करुन ट्रॅक्टर घेऊन पळुन गेले, अशा तहसीलदार पुजा मातोडे यांच्या जबानी रिपोर्ट वरुन घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शशीकांत नागरगोजे हे करित आहे.