Home यवतमाळ ब्रिगेडशी सलगी करणे, सेनेला पडणार महागात.?

ब्रिगेडशी सलगी करणे, सेनेला पडणार महागात.?

474

जिल्हयातील मोठा गट शिंदे गटाच्या वाटेवर, राठोडांच वाढणार प्राबल्य

यवतमाळ/ हरीश कामारकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पूर्णेपणे पोखरून निघाली. शिंदेंचे ४० आमदार, बहुतांश खासदार आणि असंख्य नगरसेवक व इतर लोकप्रिनिधींनीनंतर ही एकापाठोपाठ अनेक धक्के सेनेला देणे चालूच आहे. यामुळे पक्षाला सावरण्याचे मोठें आव्हानं पक्षप्रमुखां समोर निर्माण झाले आहे. याचं दरम्यान पक्षाला एखाद्या सक्षम भिडूची गरज असल्याने मागील काही महिन्यांपासून युतीसाठी उध्दव ठाकरे पर्यायांच्या शोधात होते. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सेना – मनसे युतीचे सुचक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. आणि ठाकरे बंधूचा “टाळीचा” विषय पुन्हा प्रकाश झोतात आला. परंतु या विधानाला दोन्हीं पक्षातून कोणत्याच नेत्याने दुजोरा न दिल्याने हा विषय फक्तं मिडिया पुरताच मर्यादित ठरला.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची ताकद वाढवून राजकरणात आपला पक्ष शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेनी मोठा प्लॅन आखला असुन याचाच एक भाग म्हणून मागील महिन्यात ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेतून संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली. विरोधाभासी असणाऱ्या दोन्हीं विचारधारा एकत्र आणून उद्धव ठाकरेंनी राज्यात नव समीकरण जुळवून आणल. परंतु ही अनोखी युती अनेक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना न रूचनारी ठरली. यामुळे उद्धव ठाकरेंच्या गोटात “कही खुशी कही गम” असे चित्र स्पष्ट झाले.

मुंबईतील शिवसेना भवनावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याने हा फोटो काढून टाकावा यासाठी 2017 मध्ये संभाजी ब्रिगेड संघटनेने रान उठविले होतें. यामुळे शिवसेना भवनाला तगडा पहारा देण्याची वेळ शिवसेने वर आली होती. तर मराठा समाजाकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला सामना वृत्तपत्रात मुका मोर्चा संबोधण्यात आल्याने 2016 साली वाद निर्माण झाला होता. या वादानंतर संभाजी ब्रिगेड शिवसेनेविरुद्ध कठोर भूमिका घेत रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. विरोधकांनीही या प्रकरणावरून शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो, असं म्हणत याबाबत माफीनामाही दिला होता. एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करणारे आता मांडीला मांडी लावून बसण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचल्याने पक्ष प्रमुखाच्या या मुद्यावर अंतर्गत नारजी दर्शवून यवतमाळ जिल्हयातील मोठा निष्ठावंताचा गट सेनेला “जय महाराष्ट्र” करून शिंदेच्या तंबूत सामील होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

संभाजी ब्रिगेड ने आजवर पुरोगामी विचारांचा पुरस्कार करुन हिंदूच्या बऱ्याच सण समारंभ, चालीरिती आणि परंपरा वर टीका केली तर शिवसेना नेहमीं हिंदूंच्या भावना जोपासत आली. त्यामुळे भिन्न विचारसरणीच झालेलं अनोखं गठबंधन अनेक पदाधिकारी आणि कट्टर शिवसैनिकांना न पटणार ठरत आहे. यामुळें उध्दव ठाकरेच्या या निर्णयाने यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसणार असुन याचा राजकिय फायदा मंत्री संजय राठोड यांना होणार असल्याचे भाकीत राजकिय विश्लेषकांकडून केल्या जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सेनेचा मजबूत ठेऊन अनेक शिवसैनिकांना लोकप्रतिनिधी बनवण्यास मंत्री संजय राठोड यांचे मोठे योगदान राहील आहे. परंतु राठोडानी पहिल्याच टप्प्यात शिंदेच्या बंडाला स्विकारून उध्दव ठाकरेंशी थेट विरोध पत्करून सेनेचा मोठा झटका दिला. याकाळात यवतमाळ जिल्हयातील शिवसैनिक संभ्रम अवस्थेत सापडले. तर शपथ विधी नंतर झालेल्या राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनात अनेक राठोड समर्थकानी आपली हजेरी लावून जाहीर रित्या संजय राठोड यांना समर्थन दर्शविले. माञ मविआ सरकार मध्ये वनमंत्री असताना राठोडां भोवती असणाऱ्या लवाजम्यामधील अनेक पदाधिकारी सेनेतच कायम राहिल्याने, संजय राठोंडाची “चीत भी मेरी पट भी मेरी” ही खेळी असू शकते असा अंदाज वर्तिण्यात येतं होता. परंतु बंडखोरांच्या विरोधात सेनेकडून करण्यात आलेल्या एका निदर्शनात हे शिवसैनिक सक्रिय असल्याने हा अंदाज मोडीत काढला गेला. त्यामुळे संजय राठोडांच्या बंडाला झुगारून उध्दव ठाकरेंच्या सेनेवर पदाधिकाऱ्यानी आपली पकड कायम ठेवली. जिल्ह्यातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरेच्या पाठीशी उभ राहून हा गट अभेद्य ठेवला परंतू भिन्न विचारसरणीने निष्ठावंताच्या या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि हेच कारण सेनेच्या या गडाला सुरुंग लावेल अशी शक्यता आता नाकारता येत नाही. येत्या काळात हे चित्र स्पष्ट झाल्यास मंत्री संजय राठोड यांचं जिल्हयात प्राबल्य वाढून कार्यकर्त्यांच गत वैभव त्यांच्या पदरात पडेल हे मात्र निश्चित….