Home यवतमाळ पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी ‘एक हात मदतीचा’…!

पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी ‘एक हात मदतीचा’…!

195

 

वृक्षांच्या छायेत 150+ जलपात्र
पर्यावरणप्रेमींचा सेवाभावी उपक्रम

यवतमाळ (प्रतिनिधी) एकीकडे शहरात सिमेंटचे जंगल, तापमानवाढ, पाणीटंचाई, जल व वायू प्रदूषण आदी पर्यावरणविरोधी समस्यांचा भडिमार वाढत आहे. पाखरांची किलबिल रोडावली असून त्यांची दाणापाण्याकरिता वणवण होत असतांना ‘एक हात मदतीचा’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मातीचे पर्यावरण पूरक जलपात्र लावण्यात येत आहे.


आज रविवारी (8 मे) सकाळी मातृदिनानिमित्त शहरातील नेहरू स्टेडियम, शिवाजी उद्यान आणि शिंदे प्लॉटमधील बगिच्यात स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने पक्ष्यांसाठी जलपात्र लावण्यात आले. ज्याठिकाणी वृक्षाची छाया, पाण्याचा स्रोत, पक्ष्यांची ये-जा व परिसरात राहणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांचा पुढाकार असेल अशाच ठिकाणी हे जलपात्र लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे टाकाऊतुन टिकाऊ या प्रयोगाचा वापर करीत संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश तिवाडे यांनी अडगळीत पडलेले मातीचे माठ, रांजण, सूरई, मातीचे पॉट व छोटे मडके आदींचा वापर केला आहे. जलपात्रांना रंग देऊन तारेच्या सहाय्याने झाडांना बांधण्यात आले आहेत. काही ठिकाणी धान्याचे फिडरही लावण्यात आले आहेत.
आज शहरात बागडणाऱ्या पक्षी पाखरांसाठी दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी कृत्रिम पण 100 टक्के पर्यावरणपूरक पाणपोईंची व्यवस्था झाली आहे. या उपक्रमांतर्गत आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी सर्वश्री मनोज व्यास, अश्विन सवालाखे, हरिबक्ष वाधवानी, बन्सी छत्तानी, माधव छत्तानी, डॉ अतुल पांडे, अनिल पांडे, बाबू त्रिवेदी, मंगेश लिखार, ओम पाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर या उपक्रमासाठी ‘एक हात मदतीचा’ या संस्थेचे अध्यक्ष सर्वश्री दिनेश तिवाडे, अर्जुन पारवेकर, गौरव बोरकर, अभिषेक सिडाम, विकी कोटनाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अक्षय तृतीया मडके संकलन मोहीम…
अक्षय तृतीयेला घराघरात पूजाविधीमध्ये मातीचे मडके वापरतात. ही मडकी नंतर फेकण्यात जातात. ही मडकी न फेकता पक्ष्यांच्या जलपात्रासाठी देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येऊन याकरिता मडके संकलन मोहीम राबविण्यात आली.

मुक्या जनावरांची सेवाशुश्रूषा…
या स्वयंसेवी संस्थेतर्फे वन्यजीवांच्या संरक्षणाबरोबरच शहरातील मुक्या प्राण्यांची सेवाशुश्रूषाही प्राथमिकतेने करण्यात असून याअंतर्गत आतापर्यंत शेकडो मोकाट जनावरांचे लसीकरण, उपचार, रेस्क्यू, औषधोपचार, पुनर्वसन करण्यात आले आहे.