Home सातारा फक्त मटण खाण्यासाठी जन्मदात्या बापाची हत्या ,

फक्त मटण खाण्यासाठी जन्मदात्या बापाची हत्या ,

656

 

आरोपीस अटक

 

अमीन शाह

देवपेक्षाही आईबापाच स्थान मोठं असत,अशा विचारांची संस्कृती जोपासणाऱ्या या समाजात कधीकधी पोटचे गोळे पण यमदूत बनतील हे सांगणे अशक्य आहे, परंतु ही अशक्यता बदलून शक्यतेत रूपांतरित होऊन प्रत्येकाच्या काळजावर घाव घालणारी अन प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेणारी ह्रदयद्रावक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी नजीक असलेल्या कासारवाडीत घडली.
या गावातील ३२ वर्षीय तरुणाने धारदार कोयत्याने वार करत आपल्या वृद्ध बापाची हत्या केली आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मटण दिले जात नाही,म्हणून या राक्षसी प्रवृत्तीच्या कारट्याने चक्क आपल्या बापावरच धारदार कोयत्याने वार केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने वृद्ध पित्याचा जागीच अंत झाला. तपासाअंती दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तासगावकर यांनी सांगितले.
सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील कासारवाडी येथे ही घटना घडली असून नटराज पांडुरंग सस्ते वय -३२ असे या आरोपीचे नाव आहे. यात्रेवरुन परत आल्यानंतर घरात काही दिवस मांसाहारी जेवण न बनवण्याचे घरच्यांनी ठरवले होते.परंतु नटराजला मटण खायची तलप व्हायची. मला काहीपण करून मटण खायचं आहे असं म्हणत नटराजने त्याच्या वडिलांशी हुज्जत घातली. त्यातूनच झालेल्या शाब्दिक चकमकीतून रागाच्या भरात नटराजने आपल्याच बापावर कोयत्याने सपासप वार केले.यात वृद्ध पिता जागीच ठार झाला अशी माहिती तासगावकर यांनी दिली.
नटराज सस्ते हा रागीट स्वभावाचा तरुण वयाच्या ३२व्या वर्षीही अविवाहीतच होता.घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याचे त्याच्या वडिलांशी नेहमी खटके उडायचे,परंतु पोलीस स्टेशनपर्यंत ही भांडण कधी पोहचली नव्हती.गावातच सामोपचाराने हा वाद मिटवला जायचा. असही तासगावकर यांनी सांगितले. नटराज सस्ते या आरोपीस दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याचेही सपोनि तासगावकर यांनी सांगत अधिकचा तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.