Home यवतमाळ घाटंजी येथील अतिक्रमण धारकांना 30 मे पर्यंत, अतिक्रमण हटविण्यासाठी वेळ देण्याची मागणी…...

घाटंजी येथील अतिक्रमण धारकांना 30 मे पर्यंत, अतिक्रमण हटविण्यासाठी वेळ देण्याची मागणी… !

456

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी : घाटंजी शहरातील खापरी नाका ते पारवा नाका पर्यंत अतिक्रमण हटविण्यासाठी 30 मे पर्यंत वेळ द्यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप विभागीय अभियंता पी. एच. धांडे यांना एका निवेदनातून अतिक्रमण धारकांनी केली आहे. सदरचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता सुभाष भोयर यांनी आज स्विकारले. निवेदनावर गजानन माकडवार, राहुल मेश्राम, पवन डोये, कमलेश चव्हाण, दिपाली घेणावत, राजु मानकर, निलेश दोनरकर, राजु अवधुतकार, सचिन डंभारे, दिनकर डोळे, नामदेव दुल्लरवार, शरद कुंटलवार, अक्षय कांदेकर, मुकूश अवथळे या सह शेकडो अतिक्रमण धारकांचे स्वाक्षऱ्या आहे.
घाटंजी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाकडून घाटंजी शहरातील खापरी नाका ते पारवा नाका येथील अतिक्रमण हटविण्याबाबत 07 एप्रिलची नोटीस अतिक्रमण धारकांना 11 एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. सदर अतिक्रमण धारकांना या पुर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभाग घाटंजी यांचे कडुन दोन वेळा अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊन नियमानुसार अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे सदरचे काम हे ईगल कंस्ट्रक्शन्स कंपनी मुंबई यांनी घेतलेले असुन ते निविदेनुसार काम करित नाही, असा आरोप या वेळी अतिक्रमण धारकांनी केला आहे. तसेच सदर कंपनीने अतिक्रमण हटविल्या शिवाय खापरी नाका ते पारवा नाका पर्यंत कामे सुरू करणार नाही, असा अल्टिमेटम सार्वजनिक बांधकाम उपविभाग घाटंजीला दिल्याचे समजते.
वास्तविक पाहता, दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तसेच अतिक्रमण धारक हे अत्यंत गरीब असल्याने त्यांचा उदरनिर्वाह किरकोळ व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच त्यांचे कडे उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे अतिक्रमण धारकांना त्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी दिनांक 30 मे 2022 पर्यंत मुदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दिनांक 30 मे 2022 पर्यंत आम्ही शासकीय जागेवरील अतिक्रमण आपसुकच काढुन घेऊ, याची आम्ही ग्वाही व हमी देतो, असे सुद्धा अतिक्रमण धारकांनी आपल्या निवेदनातून म्हटले आहे.
तेव्हा, खापरी नाका ते पारवा नाका पर्यंत अतिक्रमण हटविण्याबाबत 30 मे पर्यंत अतिक्रमण हटविण्याबाबत वेळ देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यवतमाळ, पांढरकवडा येथील उप विभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार घाटंजी व ठाणेदार पोलीस स्टेशन पारवा आदींना देण्यात आले आहे.