Home अकोला अँड गुणरत्न सदावर्तें विरुद्ध अकोट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

अँड गुणरत्न सदावर्तें विरुद्ध अकोट पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

928

 

अमीन शाह

 एसटी महामंडळाच्या कामगारांना खोट्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याप्रकरणी अकोट पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंसह तिघांविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटनेचे कार्याध्यक्ष विजय ओंकारराव मालोकार (रा. अकोला) यांनी अकोट पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान काही कर्मचारी, पदाधिकारी वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करून फसवणूक करीत आहेत. संपादरम्यान प्रशासनाने कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली आदेश काढले आहेत. त्यातून आपली सुटका व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरू झाले होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत अजयकुमार गुजर व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी खोट्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० व ५०० रुपये जमा केले आहेत. राज्यभरातून कर्मचाऱ्यांकडून जवळपास ३ कोटी रुपये जमा केल्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढे आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचाऱ्यांद्वारे संकलित केलेले ७४ हजार ४०० रुपये १४ नोव्हेंबर २०२१ रोजी अकोट डेपोत वाहक म्हणून नेमणुकीवर असलेल्या प्रफुल्ल गावंडे यांनी अजयकुमार गुजर यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. प्रशासनाद्वारे केलेली कार्यवाही रद्द करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांकडून अजयकुमार गुजर व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे गोळा केले आहेत. ॲड. सदावर्ते यांनी त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांच्या मध्यस्थीने अजयकुमार गुजर व प्रफुल्ल गावंडे यांच्याकडून अकोट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे ७४ हजार ४०० रुपये जमा करून फसवणूक केली आहे, अशा फिर्यादीनुसार, अकोट पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते, अजयकुमार बहादुरसिंग गुजर, ॲड. जयश्री पाटील व प्रफुल्ल गावंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अकोट पोलीस करीत आहेत.