
इकबाल शेख – वर्धा
पुलगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळणी(भागवत) शेतशिवारातील शेतकरी भुषण वाघमारे व कमलाकर पाटील यांच्या शेतामधील विहिरीतील मोटरपंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. तसेच मौजा नागझरी ग्रामपंचायतचे स्टोअर रूममधुन दोन मोटरपंप स्टोअर रूमचे कुलूप तोडून चोरून नेल्या अशी तक्रार पोलीस स्टेशन, पुलगांव येथे प्राप्त असून त्याबाबत वेगवेगळे गुन्हे नोंद होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैळेश शेळके यांनी गुन्हे प्रगटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाकडे वर्ग केला. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुदेदमाल व आरोपीबाबत तपासचक्र फिरवून पथकाने अत्यंत शिताफीने गुप्त बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करून मौजा तळणी (भागवत) येथील मंगेश अरूणराव कंगाले यास ताब्यात घेवून चोरीसंबधाने सखोल विचारपुस केली असता त्याने व त्याचा बाहेर जिल्ह्यातील साथिदार सागर अशोकराव वानखेडे, रा. सावंगी(राऊत) ता. बाभुळगाव जि. यवतमाळ यांनी मिळून दोन्हीही ठिकाणावरून चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीच्या ताब्यातुन चोरीस गेलेले मोटरपंप तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल क्र. एम.एच.29 ए.बी. 0494 असा एकुण जुमला किंमत 33,900/- रू. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंखे, उविपोअ. गोकुळसिंग पाटील, पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन, पुलगाव येथील गुन्हे प्रगटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टाकोणे, शरद सानप, महादेव सानप यांनी केली असुन पुढील तपास करीत आहे.
पुलगांव पोलीसांच्या अथक प्रयत्नातून शेतकऱ्यांचे शेतीऊपयोगी मोटरपंप मिळाले व चोरटे जेरबंद झाल्याने फिर्यादिच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पोलीस तर त्यांचे काम कौशल्याने करणारच आहे. परंतू पुलगांवकरांनी खबरदारी घेण्याबाबत ठाणेदार शैलेश शेळके यांनी आवाहन केले आहे.










































