
रावेर (शेख शरीफ)
दसनूर येथील उमेश्वर महादेव मंदिरात साधारणतः एक महिन्यापासून सुरू असलेले वारकरी शिक्षण व बाल संस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले .

या शिबिरात मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी ह.प.गुरुवर्य ज्ञानेश्वर- जी महाराज शेगावकर हे लाभलेले होते .शिबिरात मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण टाळ वादन, अभंग गायन ,मृदंग वादन, हरिपाठ म्हणे आणि पावली खेळणे इत्यादी गोष्टी शिकवल्या गेल्या .शिवाय मुलांच्या बालमनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी संतांची शिकवण, संतांनी केलेले कार्य ,त्यांचे महत्त्व शिकवले गेले . वारकरी संप्रदायाची गावाची परंपरा कायम राहील शिवाय सराव करण्याच्या निमित्ताने मुले एकत्र राहिली, सहकार्याची भावना त्यांच्यात वाढीस लागली ,माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ही मुले मोबाईल पासून लांब राहिली आणि मुलांची वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याची धडपड पाहून पालकवर्गही सुखावला .सांगता समारंभाच्या वेळी वारकरी संप्रदायाची पांढऱ्या पोशाखातील मुलांची भव्य दिंडी सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली. प्रशिक्षण शिबिर यशस्वी होण्यासाठी उमेश्वर महादेव मंदिर संस्थान ,भजनी मंडळ व समस्त गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .हे प्रशिक्षण गावात आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे.











































