Home शिर्डी शिर्डीतील साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवार/रविवार ऐवजी इतर दिवशी सुट्टी द्यावी ,

शिर्डीतील साई संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवार/रविवार ऐवजी इतर दिवशी सुट्टी द्यावी ,

574

 

जितेश लोकचंदानी यांची शासनाकडे मागणी

शौकत भाई शेख 

शिर्डी (प्रतिनिधी) – येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी / उप मुख्यकार्यकारी अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांना शनिवार/रविवार ऐवजी इतर दिवशी सुट्टी द्यावी, कारण शनिवार/रविवार या सुट्टीकाळात साईभक्तांची शिर्डीत मोठी वर्दळ असते,या काळात साई संस्थानचे वरिष्ठ अधिकारी हे साईभक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध असावेत म्हणून त्यांना या काळात शासकीय सुट्टी देण्याऐवजी इतर दिवशी सुट्टी‌ घेण्याची सूचना प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना करावी अशा मागणीचे निवेदन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,प्रधान सचिव, विधी व न्याय मंत्रालय, प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले की,
श्रीसाईबाबांजींच्या कृपाशिर्वादामुळे श्रीक्षेत्र शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे तीर्थक्षेत्र असून श्रीक्षेत्र शिर्डी शहरात साईभक्तांची दिवसेंदिवस मोठी वर्दळ वाढत आहे. श्रीसाईबाबांजींच्या दर्शनासाठी शनिवार/रविवार या सुट्टीच्या काळात साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत होत असते,मात्र याच दिवशी शनिवार/रविवारी श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी/ उप मुख्यकार्यकारी अधिकारी हे अनेक वेळा सुट्टीवर असतात. रविवारी शासकीय सुट्टी असली तरी शिर्डीत मात्र साई संस्थानचे अनेक विभाग सुरु असतात, आणि भाविकांची याच दिवशी जास्त रेलचेल तथा वर्दळ असते. प्रसादालय, निवासस्थाने, दर्शनरांग,सुरक्षा विभाग,आरोग्य विभाग व रुग्णालय हे सर्व रविवारी देखील सुरू असतात. त्यामुळे साई संस्थानच्या कामकाजावर शनिवार/रविवारी या सुट्टीच्या दिवशी गर्दी काळात व्यवस्थापनचे सुनियोजन, सुनियंत्रण असावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी/उप मुख्यकार्यकारी अधिकारी या दिवशी सुट्टीवर नव्हेतर ड्युटीवर असणे गरजेचे असताना,रविवारी मात्र त्यांना शासकीय सुट्टी असल्या कारणाने ते सुट्टीवर असतात.शिर्डीत नेहमीच गर्दी तर आहेच परंतु शनिवार व रविवार रोजी जास्त प्रमाणात भक्तांची गर्दी होत असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी/ उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी रविवारी सुट्टी न घेता त्यांनी इतर दिवशी शासकीय सुट्टी घ्यावी, त्यासाठी आपण श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला तशा सूचना कराव्यात.जेणेकरून भाविकांच्या काही अडचणी असल्यास मुख्य वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याने त्या अडचणी सोडवताना उपस्थित कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची मुभा नसते,त्यामुळे त्यांची मोठी अडचण निर्माण होते,तसेच या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळ मर्यादा देखील ठरवून द्यावी. अशी मागणी श्री. लोकचंदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा विविध मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना निवेदनपत्राद्वारे केली आहे.