
ना. उदय सामंतांना पाठवणार लाखो इमेल

यवतमाळसह अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, पुणे आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नोंदवली मागणी

यवतमाळ – जगात सध्या सर्वत्र कोरोना विषाणुचा दबदबा आहे. नुकतेच राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या पार्श्र्वभूमीवर मुंबईसह इतर भागात निर्बंध लादले आहे. त्यातच राज्यातील शाळा, महाविद्यालये देखील बंद करण्याबाबत राज्य शासनाचा मानस असून तूर्तास याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले शाळा महाविद्यालये पुन्हा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे निश्चित असल्याने राईट्स अॅन्ड वेलफेअर असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ इंडिया (आरवासी) या विद्यार्थी संघटनेने “से नो टू कॉलेज बंद” हे अनोखे आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनाचे माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना राज्यभरातून लाखो विद्यार्थी इमेल पाठवून आमचे शाळा महाविद्यालये बंद करु नका, अशी मागणी केली आहे.
कोरोना संक्रमनाच्या काळात सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला होता. या काळात सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती. राज्य शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे पुरेसे तंत्रज्ञान व सोईसुविधा नसल्याने त्यांच्या आॅनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता. नियमित शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची गाडी रूळावर यायला लागली होती. अशातच पुन्हा शाळा महाविद्यालये बंद करण्याबाबतच्या चर्चांमुळे हि घडी विस्कटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आतातरी पुन्हा शाळा महाविद्यालये बंद करु नका, अशी विनंती आरवासी या विद्यार्थी संघटनेने ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान शाळा महाविद्यालये बंद होती, त्यामुळे सर्व विद्यार्थी व खास करून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले होते. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. त्यामुळे पुन्हा शाळा महाविद्यालये बंद नकोच, हि विद्यार्थ्यांची भावना आहे. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकटचा मजकूर
“शिक्षण हि जीवनावश्यकच बाब!”: निखिल सायरे
मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक बाबी आहेत. बदलत्या काळासोबत यात शिक्षण हि देखील जीवनावश्यक बाब झाली आहे. शिक्षणाशिवाय मनुष्य प्रगती करु शकत नाही, त्यामुळे लॉकडाऊनचे नावाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करू नका, अशी मागणी राईट्स अॅन्ड वेलफेअर असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ इंडिया (आरवासी) चे निखिल सायरे यांनी केली.










































