Home जळगाव ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक राहावे – तहसीलदार अनिल गावित यांचे आवाहन

ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक राहावे – तहसीलदार अनिल गावित यांचे आवाहन

303

रावेर (शेख शरीफ)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ग्राहकांनी जागरूक राहून कोणत्याही वस्तूची खरेदी करावी. तसेच आपल्या ग्राहक हक्क संरक्षणाबाबतही त्यांनी जागरूक राहावे, असे आवाहन तहसीलदार अनिल गावित यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चोपडा तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक प्रबोधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

तहसीलदार गावित म्हणाले की, ग्राहक संरक्षण हक्क कायदा हा ग्राहकांसाठी असून, त्यांनी या कायद्याचा नक्की फायदा घ्यावा. त्यांना शासनाकडून आणि प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाहीदेखील तहसीलदार गावित यांनी या वेळी बोलताना दिली. केवळ वर्षभरातून एकदा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून कार्यक्रम न करता पूर्ण वर्षभर ग्राहकांच्या सोयी-सुविधांसाठी आपण कार्यरत राहायला हवे, असेही आवाहन तहसीलदार गावित यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि माल्यार्पण करीत करण्यात आले. चोपडा तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात चोपडा शहरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच इतर ग्राहक प्रबोधनासाठी पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले.

ग्राहक कल्‍याण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष कैलास महाजन यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. फाउंडेशनकडून सदैव ग्राहक संरक्षण करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत, असेही माली यांनी सांगितले.

*आम्ही ग्राहकांसाठी सदैव तत्पर*
या वेळी ग्राहक पंचायतीचे प्रबोधन मंत्री विकास जोशी यांनी बोलताना सांगितले की, सध्या ग्राहक फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. त्याबाबत ग्राहक पंचायत विविध माध्यमांद्वारे ग्राहकांना जागरूक करीत आहे. ग्राहकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतीतही जोशी यांनी माहिती दिली. ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक पंचायत सदैव तत्पर असून आपण आपल्या अडचणी आमच्यापर्यंत आणल्यास ते आम्ही सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू एखाद्या वेळेस आपली कोणी फसवणूक केली असल्यास आम्हाला कळविल्यास आम्ही त्यासाठी निश्चित प्रयत्न करू आणि तुमची म्हणजेच ग्राहकांची होणारी फसवणूक होऊ देणार नाही अशी ग्वाही देखील जोशी यांनी शेवटी बोलताना दिली. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या प्रबोधनपर कार्यक्रमात चोपडा शहरातील ग्राहकांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी करोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्यात आले होते.

*ग्राहक प्रबोधन पोस्टर्सचे अनावरण*
या वेळी मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांच्या प्रबोधनासाठी पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या पोस्टर्सद्वारे चोपडे शहरातील विविध व्यापारी आणि व्यवसायिकांच्या दुकानांवर ग्राहकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. या पोस्टरमध्ये ग्राहक संरक्षण हक्क कायद्याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांनी कोठे संपर्क करावयाचा आहे याबद्दलही सांगण्यात आले आहे.

*ग्राहकांनो, सजग व्हा!*
ज्येष्ठ पत्रकार अनिल पालिवाल यांनीदेखील यावेळी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, सध्या ऑनलाइन खरेदीचा जमाना असून, ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा जास्तकरून कल असतो. मात्र, ऑनलाइन खरेदी करीत असताना आपण आपली फसवणूक तर होणार नाही ना याबाबतही काळजी घ्यायला हवी. जेणेकरून आपले पैसे आणि आपली माहिती सुरक्षित राहू शकते. त्यासोबतच बाजारपेठेत कोणत्याही वस्तूची खरेदी करतानादेखील ग्राहकांनी सजगता बाळगायला हवी. एखाद्या वस्तू खरेदीत तिची एक्सपायरी डेट, पॅकिंग डेट पहावी, जर आपली फसवणूक झाली असेल तर तातडीने ग्राहक मंच अथवा त्यांच्या टोल फ्री क्रमांक किंवा मग त्या शहरातील ग्राहक पंचायतीकडे संपर्क करायला हवा असेदेखील पालिवाल यांनी यावेळी सांगितले.

*यांची होती प्रमुख उपस्थिती…*
यावेळी प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार तथा साथीदार न्यूज डॉट कॉमचे मुख्य संपादक अनिलकुमार पालीवाल, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष योगेश भीमराव महाजन, ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष नारायण साळुंखे, तालुका सचिव प्रवीण देवरे, प्रबोधन मंत्री विकास जोशी, तसेच ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या शहराध्यक्षा संध्याताई नरेश महाजन, नगरसेविका मीनाताई शिरसाठ, तालुका सचिव प्रदीप मनोहर पाटील, ग्राहक कल्‍याण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष समाधान माळी आणि प्र पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर, चोपड्याचे पुरवठा निरीक्षक शिवराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन चोपडा तहसील कार्यालय पुरवठा विभाग, चोपडा ग्राहक पंचायत आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी चोपडा तहसील पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन राधेशाम पाटील सर यांनी केले.