Home विदर्भ महात्मा गांधींना आपल्या कार्यातून आदरांजली – पालकमंत्री सुनिल केदार

महात्मा गांधींना आपल्या कार्यातून आदरांजली – पालकमंत्री सुनिल केदार

84
0

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापण दिन उत्साहात साजरा.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटीबध्द…!

वर्धा , दि. २६ :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिडशेवी जयंती देश विदेशात साजरी होत असताना वर्धा जिल्ह्याला मिळालेल्या बहुमानाच्या या संधीचं सोन करावं. आपल्या जिल्ह्यातील सर्व संस्था, प्रशासन, आणि नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या कर्तव्याच पालन करून महात्मा गांधींना आपल्या कार्यातून आदरांजली दयावी, असे प्रतिपादन पशु संवर्धन, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण प्रसंगी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलिस अधिक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांशी बोलतांना ते म्हणाले, गोर-गरीब माणूस उपाशी राहू नये आणि त्याला योग्य पोषक आहार मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजना सुरू केली. आज त्याचा शुभारंभ वर्धेसोबतच संपूर्ण राज्यात झाला आहे. राज्यातील व जिल्ह्यातील गरीबातील गरीब व्यक्तीला अगदी अल्प दरात भोजन मिळावं हा उद्देश या योजनेमुळे निश्चित साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अतिशय वाईट परिस्थितीतून जाणाऱ्या शेतक-यांना शासनाने कर्जमुक्ती देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच शेतकऱ्याला अधिक बळकट करणे, त्याला आणखी सवलती देण्याची गरज आहे . त्यादृष्टीने हे शासन अग्रणी राहणार आहे
ग्रामीण भागातील गोर गरीबाच्या मुलाच्या शिक्षणासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या शिक्षणाच्या व्यवस्था व्यवस्थित आहेत की नाही? हे पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहे. तिथे गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळत की नाही? त्यांच्यापर्यंत राज्यशासनाच्या सर्व योजना पोहचतात का? त्यांचे आरोग्य व्यवस्थित आहे की नाही? आणि त्यांना आणखी कोणत्या सुविधांची गरज आहे याची काळजी घेणं गरजेचं आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिला आढावा शिक्षण विभागाचा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी समाजातील सर्व लोक एकत्र येउन जल्लोष करतात. पण जल्लोष करत असताना या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांनी काम करावे . अधिकारासोबतच कर्तव्याला सुद्धा तेवढेच महत्व दयावे असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या जिल्हयाच्या विकासाठी पालकमंत्री म्हणुन कटीबध्द असल्याचे सांगून विकासाच्या आड कोणतेही राजकारण येणार नाही याची काळजी घेणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सुनिल केदार यांनी परेड निरिक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी., स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड योजनेवर उत्कृष्ट झाकी , आपात कालीन वैद्यकिय सेवा, पोलिस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्र वाहन पथक, आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला.
यावेळी पालकमंत्र्याचे हस्ते जिल्हयातील शहिद जवान प्रेमदास मेंढे यांच्या परिवाराला 25 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेल्या आर्वी तालुक्यातील मिर्झापूर (नेरी ) ग्राम पंचायतीला प्रथम पुरस्कार 5 लक्ष रुपये, हिंगणघाट तालुक्यातील जांगोणा ग्राम पंचायतीला व्दितीय पुरस्कार 3 लक्ष रुपये व काचनगाव ग्राम पंचायतीला 2 लक्ष रुपये, मोहित सहारे व आंकाशा काकडे यांना 10 हजार रुपये, व अध्ययन भारती संस्था यांन 50 हजार रुपयाचा धनादेश देऊन जिल्हा युवा पुरस्कार, व वयोवृद आंतरराष्ट्रीय धावपटू जानराव लोणकर यांना प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणूका जिल्हा प्रशासनाने शांत व निभर्य वातावरणात पार पाडल्याबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचा सन्मानचित्र देऊन सत्कार करण्यात आला स्काऊट गाईडच्या साक्षी चौधरी, शासकिय उत्कृष्ट कामगिरी बाबत जलसंपदा विभागाचे कर्मचारी साहेबराव गोडे , गुणवत्त खेळाडू श्रध्दा जनार्धन शिरपूरकर, पुजेश नितीन डफळे, राजेश उमरे यांचाही यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सामुहिक कवायती सोबतच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.
कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक , मोठया संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल राजपायले यांनी केले.